पुणे- शहरात शनिवारीही बाधित संख्येपेक्षा करोनामुक्त व्यक्तींची संख्या सर्वाधिक होती. मागील दोन दिवसांत केलेल्या नमुने तपासणी अहवालातून 1,506 जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. तर दिवसभरात 1 हजार 791 जण करोनामुक्त झाले. दरम्यान, गेल्या 24 तासांत करोनामुळे 23 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, शहरातील मृत्यूच्या संख्येने 1 हजार 335 चा टप्पा गाठला आहे.
सात हजारांपर्यत पोहचलेली नमुने तपासणी संख्या मागील आठ दिवसांपासून दररोज सहा हजारांच्या जवळपास होत आहे. शनिवारी (दि.1) 5 हजार 863 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. आतापर्यंत शहरात बाधित संख्या 55 हजार 761 वर पोहचली असून, त्यातील 36 हजार 914 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
सध्या 17 हजार 512 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 638 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 389 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. तर अन्य बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. दरम्यान, दि. 22 आणि 23 जुलै रोजी शहरात जवळपास सोळाशे ते अठराशे बाधित सापडत होते. त्यामुळे दहा दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी जवळपास 1 हजार 791 बाधित करोनामुक्त झाले आहेत. मागील चार दिवसांपासून बाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.