जबलपूर – कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राज्यसभेवरील निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्यासाठी मध्य प्रदेशातील कॉंग्रेसच्या एका आमदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कॉंग्रेसचे आमदार डॉ. गोविंद सिंह यांनी ज्योतिरादित्य यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठीच्या अर्जासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ज्योतिरादित्य यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती दडवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
राज्यसभा निवडणुकीतील मतदार या नात्याने याचिका दाखल केल्याचे सिंह यांनी नमूद केले आहे. तसे असले तरी ज्योतिरादित्य यांच्याशी राजकीय संघर्ष करण्याच्या मूडमध्ये कॉंग्रेस असल्याचे संबंधित घडामोडीतून स्पष्ट होत आहे.
ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशातील त्यांचे समर्थक असणाऱ्या कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामे दिले. त्या बंडामुळे बहुमत गमवावे लागल्याने कॉंग्रेसला मध्य प्रदेशची सत्ता सोडावी लागली. त्यातून त्या राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर काही दिवसांतच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने ज्योतिरादित्य यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत ज्योतिरादित्य विजयी झाले.