करोनाने दिवसभरात 14 मृत्यू : 331 जण संसर्गमुक्त
पुणे – शहरात सलग तिसऱ्या दिवशी करोनाबाधित संख्येचा 500चा आकडा कायम आहे. शुक्रवारी (दि. 26) तब्बल 595 बाधित सापडले. तर, 14 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत 572 बाधितांचा मृत्युची नोंद झाली आहे. दुसरीकडे दिवसभरात सर्वाधिक 331 जण करोनामुक्त झाले आहेत.
शुक्रवारच्या आकडेवारीनुसार शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या 14 हजार 780 पर्यंत पोहचली आहे. अवघ्या तीन दिवसांत शहरात तब्बल 1 हजार 627 बाधित सापडले आहेत. गुरूवारी (दि. 25) 3 हजार 453 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. तर काही अहवाल प्रतीक्षेत होते.
त्यानुसार मागील दोन दिवसांतील साधारण तीन हजार नमुने तपासणीच्या अहवालातून आजच्या बाधितांची संख्या समोर आली आहे. शुक्रवारी (दि. 26) दिवसभरात आणखी 3 हजार 378 स्वॅब घेण्यात आले.
सद्यस्थितीत शहरातील विविध रूग्णालयात 5,575 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 330 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून 67 बाधितांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 263 बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
तर अन्य बाधितांवर करोना वॉर्डमध्ये उपचार दिले जात आहे. शहरातील विविध क्वारंटाइन सेंटरमध्ये एकूण 12 हजार 299 करोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.