नवी दिल्ली- करोनाचा धोका नको म्हणून लोक सध्या घराबाहेर पडण्याचे टाळत आहे. आपले व्यवहार अथवा खरेदी शक्यतो ऑनलाइन करण्याकडे नागरिकांचा ओढा आहे. मात्र ग्राहकांच्या याच
व्यवहारांचा लाभ घेण्यासाठी काही सायबर गुन्हेगार टपून बसले असून त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा विविध बॅंकांनी जारी केला आहे. बॅंक ऑफ बडोदानेही आज असा इशारा आपल्या ग्राहकांना दिलाअसून खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.
ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर मेल अथवा लींक पाठवली जाते. सोशल मीडिया अथवा मेलच्या माध्यमातून या गोष्टी पाठवल्या जातात. त्यात बॅंकांकडून मोफत कोविड चाचणी घेतली जात असल्याचे सांगण्यात येते व लींकवर क्लीक करायला सांगितले जाते. बॅंका अशा कोणत्याही चाचण्या घेत नसून अनोळखी व्यक्तीकडून आलेले मेसेज अथवा लींकबाबत कोणती कृती करताना सावधानता बाळगा असा सल्ला बॅंकांकडून दिला जात आहे. एसएमएस अथवा मेल पाठवून नागरिकांची माहिती मागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यानंतर काहीतरी मोफत देण्याचे गाजर दाखवले जाते. गोड बोलण्याची भुरळही घातली जाते.मोफत मिळण्याच्या लालसेने ग्राहक या आमिषांना बळी पडतात व त्यांचे नुकसान होते.