पळसदेव -गावातील 9 व्यक्तींचे संपूर्ण कुटुंब व शेजारी राहणाऱ्या 2 अशा 11 व्यक्ती करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे इंदापूरकरांची चिंता अधिकच वाढली आहे.
पळसदेव (ता. इंदापूर) गावातील एक पोलीस कर्मचारी शुक्रवारी (दि. 15) दोन दिवसांची सुट्टी काढून आपल्या मूळ गावी पळसदेव येथे आला. दोन दिवस घरी थांबल्यानंतर सोमवारी (दि. 18) पहाटे ही व्यक्ती पुन्हा पुणे येथे नेमणूक असलेल्या आपल्या मुख्यालयात हजार झाली. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने त्रास होऊ लागल्याने त्यास तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याची करोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली आहे, त्यामुळे इंदापूरकरांची चिंता अधिकच वाढले आहे.
इंदापूर तालुक्यातील पोंदकुलवाडी परिसरात शुक्रवारी (दि. 22) दोन करोना रुग्ण आढळून आल्याने इंदापूर तालुक्यात खळबळ माजली आहे. मुंबईहून आलेल्या मायलेकरांना कोणाचे लागण झाल्याने त्यांच्यावर इंदापूर शहरामधील डॉ. कदम गुरुकुल याठिकाणी उपचार सुरू आहेत. तर हे दोन्ही रुग्ण परिसरातील जवळपास 11 नागरिकांच्या संपर्कात आले असल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर या 11 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. असे असतानाच पळसदेवमधील ही गंभीर घटना समोर आली आहे.
दरम्यान, पोंदकुलवाडील 11 जणांचा अहवाल येणे बाकी असून पळसदेवमधील या 11 जणांची माहिती कानावर आल्याने एकूण 22 जणांचे अहवाल आता काय येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पळसदेवमधील 11 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने करोना चाचणीसाठी घेण्यात येणार असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय ते समजेल. या सर्व 11 जणांना तात्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. -सोनाली मेटकरी, तहसीलदार, इंदापूर.