बॉलीवूडची “धक-धक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयासह नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते. माधुरीचा डान्स आजही युवा कलाकारांना प्रेरित करत असतो. नृत्याशिवाय माधुरीला गाण्यात रस आहे. अनेकदा तिचे गाणे गुणगुणत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आता अलीकडे लॉकडाऊनमध्ये माधुरीचे “कॅन्डल’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात माधुरीने तिच्या गाण्याच्या कौशल्यांने सर्वांना मोहित केले आहे.
या गाण्याच्या माध्यमातून माधुरी दीक्षित करोना व्हायरससंदर्भात लोकांना नवी आशा देत आहे. विशेष म्हणजे, हे गाणे माधुरीने इंग्रजीमध्ये गायले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना माधुरी दीक्षितने लिहिले की, “मी आनंदी, उत्साहित आणि थोडी नर्व्हस आहे. हे माझे पहिले गाणे रिलीज होत आहे. मला आशा आहे की हे गाणे तयार करताना आम्हाला जेवढी मज्जा आली, तितकीच मज्जा हे गाणे ऐकताना तुम्हालापण येईल. हे गाणे चाहत्यांना खूप आवडले असून अनेकांनी माधुरीच्या गाण्याचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
माधुरी दीक्षितच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, गतवर्षी ती “कलंक’ आणि “टोटल धमाल’मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता ती एका रिऍलिटी टीव्ही शोमध्ये जज म्हणून परत येणार आहे. “डान्स दिवाना’ या रिऍलिटी शोच्या नवीन सीझनमध्ये ती दिसणार आहे.