मृतांमध्ये पुन्हा वाढ : दैनंदिन रुग्णसंख्येत मात्र घट
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज 364 नवीन रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी मृतांमध्ये आज वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 28 करोनाबाधित रुग्णांना प्राण गमावावे लागले.करोनामुळे आजपर्यंत 1991 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी आढळलेल्या शहरातील 352 रुग्णांमुळे आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या 83 हजार 785 इतकी झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 352 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 12 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 24 तासांमध्ये 28 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 15 व शहराबाहेरील 13 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 83,785 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 3129 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 474 रुग्णांचाही समावेश आहे.
रविवारी पुन्हा मृतांची संख्या वाढली. दिवसभरात शहरात 28 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील पिंपळे सौदागर, थेरगाव, काळेवाडी, आकुर्डी, नेहरूनगर, भोसरी, चिखली, चिंचवड येथील 15 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहाराबाहेरील रायगड, कामशेत, अहमदनगर, खेड, आळंदी, धनकवडी, कात्रज, फुरसुंगी, गोखलेनगर, देहूरोड, देहूगाव, शिरगाव येथील 13 रुग्णांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 383 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 78,149 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2931 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. अद्याप 1037 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.