मुंबई – ‘गडी एकटा निघाला… ८३ वर्षाचा योद्धा…’ अशा आशयाचे बॅनर मुंबईत लावण्यात आले आहे. तर अजित पवार यांच्या मार्गावर शरद पवार समर्थकांचे बॅनर लागले आहेत. राज्यात तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना राजकीय धक्का देत शिवेसना-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी रविवारी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांची मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे त्यांच्यासोबत होते. त्यानंतर आता पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरु झाला असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
दरम्यान आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे शक्तीप्रदर्शन असून दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचे, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच गोंधळात सापडल्याचे चित्र आहे. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप बजावला आहे.