महाराष्ट्रात एमबीबीएसच्या 970 जागा वाढल्या

केंद्र सरकारकडून देशभरातील 4465 जागा वाढवण्यास मान्यता

नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशभरात एमबीबीएसच्या 4465 जागा वाढविण्यास मंजुरी दिली आहे. यात महाराष्ट्राच्या वाटाल्या सर्वाधिक 970 जागा आल्या आहेत. महाराष्ट्रात खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (Economically Weaker Section) 10 टक्के आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने जागा वाढवण्यासाठी मान्यता दिली.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने एमबीबीएसच्या जागा वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. मंत्रालयाने प्रस्तावाला मान्यता देत 2019-20 च्या प्रवेश प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू करण्यात आलेल्या आरक्षणाअंतर्गत भराव्यात, असे आदेश दिले आहेत.

राज्यात वाढलेल्या एमबीबीएसच्या जागा खुल्या वर्गातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरतील. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात आहे. राज्य सरकारने हा प्रश्न सातत्याने दिल्लीत उपस्थित केला होता, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

राज्यात डॉक्‍टरांची कमतरता लक्षात घेता अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्‍टर तयार व्हावेत, हा मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांना जास्तीत जास्त 450 जागा वाढवून मिळाल्या आहेत.

मेडिकल कॉलेज – वाढीव जागा
बी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पुणे 50
डॉ. वैश्‍यंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज, सोलापूर 50
डॉ. शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट कॉलेज, नांदेड 50
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, अकोला 50
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, औरंगाबाद 50
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, चंद्रपूर 50
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गोंदिया 50
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जळगाव 50
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मिरज 50
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नागपूर 50
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मुंबई 50
एच बी टी मेडिकल कॉलेज आणि डॉ. आर एन कुपर महापालिका रुग्णालय, जुहू, मुंबई 50
इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय, नागपूर 50
लोकमान्य टिळक महापालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई 50
राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे 20
सेठ जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई 70
श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, यवतमाळ 50
श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, धुळे 50
एसआरटीआर मेडिकल कॉलेज, अंबाजोगाई 50
टोपीवाला नॅशलन मेडिकल कॉलेज, मुंबई 30

Leave A Reply

Your email address will not be published.