जीवनगाणे : पडू नकोस… उठून उभा राहा…

-अरुण गोखले

खरंच खेळ आणि खेळाची साधने आपल्याला खूप काही सांगून आणि शिकवून जात असतात. परवाचीच गोष्ट छोट्या अविचा वाढदिवस होता. आम्ही तो मोठ्या आनंदाने आणि कौतुकाने साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्याने अविला नवे कपडे, खाऊ आणि खूप खेळणी मिळाली.

त्यातलेच एक खेळणे हे त्याला फारच आवडले. त्या खेळण्याशी खेळायचे आणि आनंदाने टाळ्या पिटायच्या हा जणू त्याचा छंदच झाला. असं कोणत खेळण होत ते? जे खेळताना त्याला इतका आनंद होत होता. ते खेळणं होतं एक बाहुला “हीट मी’ नावाचा. त्या बाहुल्याला जोरात ठोसा मारला की तो आडवा पडायचा आणि लगेच दुसऱ्याच क्षणी पुन्हा उठून पूर्ववत उभा राहायचा. त्यामुळे त्या खेळण्याला सारखे ठोसे मारायचे, पाडायचे आणि तो “हीट मी’ उठून पुन्हा उभा राहिला की, आनंदाने टाळ्या पिटायच्या यात अविला मोठी मज्जा वाटत होती.

त्याचं ते खेळणं… तो खेळ… आणि त्यातून मिळणारा आनंद हे सारं पाहात असताना माझ्या मनात विचार येत होता की, पडायचं तरीही पुन्हा उभं राहायचं हे लहान मुलांना सहज शिकवून जाणारं ते खेळणं हे मुलांसाठी आहे का मोठ्यांसाठी? जीवनाचेही तसंच आहे. इथं कधी पडायला होतं, कधी वाकायची, मोडायची वेळ येते. तरीही त्या परिस्थितीतही स्वत:ला सावरून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहायचे, हीच यशस्वी जीवनाची शिकवण असते. ही अशी परिस्थितीशी झगडण्याची शिकवण आपल्याला या अशा खेळाच्या साधनातून मिळत असते.

प्राक्‍तनाचे, परिस्थितीचे, दैवाचे कितीही ठोसे खावे लागले तरी पडू नकोस, तर पुन्हा उठून उभा राहा. पिचून खचून जाऊ नकोस. हताश होऊ नकोस, निराश होऊ नकोस. अपयश ही यशाची पायरी असते. अंधारातून वाट काढत जाणाऱ्यालाच प्रकाश भेटतो. जो लढतो तोच जिंकतो. ह्या सारख्या गोष्टी जर जीवनात अनुभवून पाहायच्या असतील तर ते या अशा खेळाच्या साधनांमधून आपण शिकायला हवे आणि त्याचे पाठ हे त्या खेळण्याच्या आनंदाबरोबरच मुलांनाही बालपणापासूनच द्यायला हवेत.

कारण जीवनाचा खरा आनंद, खरं सुख आणि समाधान हे मोडून पडण्यात नाही तर परिस्थितीवर प्रयत्नांनी मात करत, अपयशाला यशात बदलत आणि “गालावरच्या अश्रूंची झाली फुले’ हे पाहण्यात आणि अनुभवण्यात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.