कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुका इतर तालुक्यांच्या तुलनेत करोना मुक्त असल्याचे समाधान व्यक्त होते न होते तोच एका पाठोपाठ एक करोना बाधीत रुग्णांची साखळी वाढत चालली आहे. शनिवारी एकाच दिवशी ५ व्यक्तींना करोनाची बाधा झाली त्यात शहरातील एका बाधीत डॉक्टरांच्या कुटुंबातील ३ ,गांधीनगर येथील १ व पढेगाव येथील एका व्यक्तीचा सामावेश आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत ४२ रुग्ण बाधीत सापडले. त्यापैकी एका महीलेचा या पुर्वीच मृत्यु झाला होता. तर काही रुग्ण करोना मुक्त होवून घरी परतले. सध्या १६ करोना बाधीत रुग्णावर कोव्हिड केअर सेंटर येथे उपचार सुरु असुन त्या पैकी एका डॉक्टरच्या कुटुंबातील ३ व्यक्ती करोना बाधीत निघाल्याने कोपरगाव तालुक्यात करोनाचा संसर्ग वाढल्याची चिंता तहसीलदार योगेश चंद्रे यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, ‘नागरीकांच्या निष्काळजीपणाचा कळस होतोय. विना परवाना बाहेरगावी जाणे, नातेवाईकांना घरी बोलवणे, बाधीत क्षेत्रातील व्यक्तींच्या संपर्कात येणे, वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली जिल्ह्याबाहेर व जिल्हाअंतर्गत फिरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे, योग्य खबरदारी न घेतल्याने तालुक्यात बाधीतांची संख्या अर्धशतकाकडे झेपावत आहे’.
करोना संसर्गजन्य आजारापासुन सुरक्षीत असलेला कोपरगाव तालुका आता असुरक्षीत अवस्थेत पोहचत आहे. जुलै महिन्यात तालुक्यात सर्वाधिक बाधीत रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासनाची धावपळ अधिक वाढली. आत्ता पर्यंत ४२ व्यक्ती करोना बाधीत सापडले पैकी ग्रामीण भागातील २३ व शहरातील १९ व्यक्ती बाधीत निष्पन्न झाले.
तहसीलदार योगेश चंद्रे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, विषेश वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी योग्य नियोज करुन बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत प्रत्येकांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांचे विलगीकरण केले. बाधीत व्यक्तींवर वेळेत योग्य उपचार पध्दतीचा अवलंब करत तालुक्याची तिन वेळा करोना बाधीतांची साखळी तोडण्यात यशस्वी मिळविले. मात्र नागरीकांची बाहेरगावी होणारी प्रवास वारी आज तालुक्याला भारी पडत आहे.
दरम्यान मजूर, गरीब, झोपडपट्टीतील अशिक्षीत व्यक्ती पेक्षा सुशिक्षित, धनसंपन्न व्यक्ती चारचाकी, दुचाकीतून बाहेरगावी विविध कारणाने प्रवास वाऱ्या करुन करोनाची लागण लावुन घेत आहेत. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात दररोज करोना बाधीतांचा आकडा वाढत चालल्याने सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी शहरातील एका बाधीत डॉक्टर च्या कुटुंबातील मुलगा, सुन व पत्नी, गांधीनगर येथील एक व पढेगाव येथील एकाला करोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. बाधीत व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. अशी माहीती डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.