वॉशिंग्टन – करोनाबाबत रोज वेगवेगळे संशोधन जाहीर होत असून आता एका नव्या पाहणीनूसार करोनाचा संसर्ग कानावाटेही होऊ शकतो, असा इशारा अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिन संस्थेने दिला आहे.
मार्च महिन्यापासून करोनाचा धोका जगभरात पसरला. त्यानंतर सर्व देशांनी यावर उपाय शोधण्यास सुरूवात केली. आतापर्यंत अनेक देशांनी यावर लस किंवा औषध शोधल्याचे जाहीर केले असले तरीही अद्याप त्याची उपयुक्तता चाचणी मानवावर करण्यात आली नसल्याने आजही हा धोका तितकाच गंभीर आहे. करोनाचा संसर्ग हस्तांदोलनाने, आलिंगनाने होऊ शकतो त्यामुळे ही कृती टाळावी तसेच सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे, बाहेर जाताना मास्कचा वापर करावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर करोनाचा विषाणू आता काही देशांमध्ये रुप बदलत असल्याचेही स्पष्ट झाल्याने चिंता वाढली आहे. त्यातच आता करोनाचा संसर्ग कानावटेही होऊ शकतो असा इशारा या संस्थेने दिल्याने चिंतेत भर पडली आहे. या बाबत तीन रुग्णांची तपासणी केल्यावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या रुग्णांच्या कानात संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कानाच्या पडद्यामध्ये हा संसर्ग होतो व त्यामुळे करोनातून पूर्ण बरा झालेल्या रुग्णांची ऐकण्याची शक्तीही कमी होऊ शकते, असेही या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमुद केले आहे.