जामखेडमध्ये तपासणीसाठी 31 जणांना घेतले ताब्यात

तालुक्‍यातील धार्मिक स्थळे देखील केली सील
नगर येथील बाधित रुग्णांच्या आले होते संपर्कात

जामखेड  -जामखेड येथील धार्मिक स्थळांमध्ये आढळून आलेल्या 10 परदेशी व 4 इतर राज्यातील अशा चौदा नागरिकांपैकी दोन जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह निघाल्याने तालुक्‍यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत चौदा लोकांच्या संपर्कात आलेल्या 31 लोकांना ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी नगरला पाठविले आहे. त्याचबरोबर शहरासह तालुक्‍यातील धार्मिक स्थळे सील केले आहेत.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 14 मार्च रोजी नगर येथील मुकुंदनगर भागातून आशिया खंडातील आयव्हरी कोस्ट, इराण, टांझानिया या देशातील 10 जण तर मुंबई व तामिळनाडू येथील 4 जण असे एकूण 14 नागरीक जामखेड येथील काझी गल्लीतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दि. 26 मार्च पर्यंत म्हणजे बारा दिवस वास्तव्यास होते. याबाबत संबंधित ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी याची कल्पना प्रशासनाला न दिल्यामुळे तसेच जमावबंदी असतानाही धार्मिक स्थळांमध्ये 14 नागरीक वास्तव्यास ठेवल्यामुळे ट्रस्टच्या तीन जणांविरोधात कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच या धार्मिक स्थळातील चौदा जणांना तातडीने नगरला जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. यातील पाच जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातून पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. याचा अहवाल रविवार दि. 29 रोजी प्राप्त झाला. यानुसार यातील दोन जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर नऊ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. यामुळे तालुक्‍यात एकच खळबळ उडाली होती. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. या चौदा जणांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये रविवारी 18 जण तर सोमवारी 13 जण अशा एकुण 31 जणांना तातडीने स्रावाचे नमुने तपासणीसाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये काही संपर्कात आलेल्या जामखेड येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. यानंतर महसूल प्रशासनाचे तातडीने पावले उचलत सोमवारी मुस्लिम समाजाचे तालुक्‍यातील राजुरी, लोणी, सांगवी ( मुसलमानवाडी), लोणी, बावी, हळगाव, दिघोळ, पाटोदा, धनेगांव, फक्राबाद व पिंपळगाव आळवासह शहरातील काझी गल्ली व खर्डा चौकातील दोन ठिकाणचे प्रार्थना स्थळे सील करण्यात आली आहेत, अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.