कराड -सफाई कामगार महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत दमदाटी करून कामात अडथळा आणल्याप्रकरणी इम्तियाज बागवान (रा. कराड) यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पिडीत महिलेने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पालिकेतील तीन सफाई कामगार महिला मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या आवारातील पार्किंगमध्ये सफाई करीत होत्या. इम्तियाज बागवान दुचाकीवरून त्याठिकाणी आले. त्यांनी सफाई न झालेल्या जागेवर आपली दुचाकी पार्क केली. कामगार महिलांनी त्याला सफाई झालेल्या ठिकाणी दुचाकी पार्क करण्यास सांगितले.
त्यावेळी त्यांनी महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच दमदाटी करीत महिलांना ढकलून देऊन ते तेथून निघून गेले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्वच्छता कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन बागवान यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.