लाखोंचा मुद्देमाल जप्त; 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुसेसावळी – खटाव तालुक्यातील पुसेसावळी व गोरेगाव वांगी येथील जुगार अड्ड्यांवर छापा टाकून औंध पोलिसांनी सुमारे 2 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी पुसेसावळी येथील सहा व गोरेगाव वांगी येथील दहा अशा 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी कालिदास बनसोडे व कुंडलिक कटरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुसेसावळी गावच्या हद्दीत येळीवकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका घरात विठ्ठल घाडगे (वय 60), सुहास कदम (वय 51), अशोक कांबळे (वय 42 ), संभाजी कदम (वय 39), सोमनाथ गुरव (वय 40), साहिल बागवान (वय 31) हे सर्वजण तीन पानी पत्त्याचा जुगार खेळत होते.
त्यांच्याजवळील रोख रक्कम व वाहने असा एकूण 2 लाख 17 हजार 515 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तसेच गोरेगाव वांगी येथील सर्जेराव कवळे यांचे घराशेजारी असलेल्या शेडमध्ये सतीश जाधव (वय 25), जगन्नाथ चव्हाण (वय 40), संतोष निकम (वय 42), प्रशांत भाग्यवंत (वय 29), अनिल भाग्यवंत (वय 32) सर्वजण रा. गोरेगाव वांगी. तसेच प्रकाश कवळे (वय 26), दौलत कवळे (वय 40), दिलीप जाधव (वय 53), किसन सावंत (वय 67), सर्जेराव कवळे (वय 65) हे जुगार खेळत असताना पोलिसांना सापडले. त्यांच्याजवळील रोख रक्कम, मोबाईल व वाहने असा एकूण 58 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, सुभाष काळेल, शिवाजी खाडे, संतोष पाडळे, कालिदास बनसोडे, सागर पोळ, चंद्रकांत शिंदे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास हवलदार सुभाष काळेल करीत आहेत.