41 लाख झाडे, अन्‌ कर्मचारी 25!

एका व्यक्‍तीकडे 1 लाख 64 हजार झाडांची जबाबदारी


वृक्षछाटणी वाहनांची संख्याही पाचच


प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नसल्याने गोची

पुणे – धोकादायक फांद्या तसेच कोसळण्याच्या अवस्थेत असलेल्या वृक्ष छाटणीसाठी महापालिकेकडे वर्षाला शेकडो तक्रारी येतात. पण, प्रत्यक्षात या कामासाठी पालिकेकडे अवघी 5 वाहने असून त्यावर काम करण्यासाठी केवळ 25 कर्मचारी आहेत. त्यामुळे शहरात पावसाळ्यापूर्वी धोकादायक वृक्ष छाटणी करण्यात अडचणी येत आहेत. तर, ही वृक्षांची छाटणी करण्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षित मनुष्यबळ शहरात नसल्याने हे कर्मचारी ठेकेदारांच्या माध्यमातून ग्रामीण भागातून मागविले जात आहेत.

कुजलेल्या झाडाची फांदी पडल्याने कोथरूड येथील दिव्यांग महिलेला आपटे रस्ता परिसरात दोन दिवसांपूर्वी जीव गमवावा लागला. यानंतर शहरातील धोकादायक झाडांची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. उद्यान विभागाकडून शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्याची छाटणी केली जाते. हे काम करण्याची जबाबदारी पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या माध्यमातून केले जाते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर या महापालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष फांद्याची पाहणी करतात. त्यानंतर आवश्‍यक प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीसमोर ठेवतात, तर काही फांद्या काढण्यास तातडीने प्रशासकीय पातळीवर मंजुरी दिली जाते. त्यानंतर या धोकादायक फांद्या काढल्या जातात.

एका वाहनावर 5 लाख झाडांचे टार्गेट
महापालिकेकडून शहरातील पाच परिमंडळात वृक्ष छाटणीसाठी पाच वाहने खरेदी करण्यात आली असून प्रत्येक वाहनावर सरासरी 4 ते 5 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांवरच सर्व वृक्षांची जबाबदारी आहे. शहरातील वृक्षगणनेत सुमारे 41 लाख झाडे असून 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाडे 10 वर्षांपेक्षा अधिक जुनी तसेच पूर्ण क्षमतेने वाढलेली आहेत. ही संख्या पाहता एका वाहनाला पावसाळ्यापूर्वी तब्बल 5 लाख झाडे येतात. त्यातील धोकादायक झाडांच्या फांद्या 10 हजार गृहीत धरल्या, तरी हे काम एका वाहनाला अशक्‍य आहे. त्यातच, या कामासाठी झाड तोडण्याचा अनुभव असलेले मजूर पालिकेस इतर जिल्ह्यांतून बोलवावे लागतात.

पावसाळापूर्व सर्वेक्षण बंद
गेल्या काही वर्षांपर्यंत उद्यान विभागाकडून पावसाळ्याआधी दोन महिने शहरातील झाडांचे सर्वेक्षण केले जात होते. त्यात धोकादायक फांद्या तसेच झाडांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येत होती. त्यानुसार, त्याला आवश्‍यक कायदेशीर मान्यता घेऊन या फांद्या छाटल्या जात होत्या. मात्र, हे पावसाळ्यापूर्वीचे सर्वेक्षण गेल्या काही वर्षांत पूर्णत: बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात पावसाळ्यात फांद्या पडून होणाऱ्या अपघातांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)