महत्वाची बातमी! रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीची किंमती जाहीर; एका डोसची किंमत असणार ‘एवढी’

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी  रशियाची स्पुतनिक व्ही लस आयात करण्यात आली आहे. याच लसीची भारतातील किंमत जाहीर झाली आहे.  ही लस भारतात 995.40 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. डॉ. रेड्डीज ही औषध निर्माता कंपनी रशियाची ही लस भारतात बनवणार असून मेक इन इंडियाची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे.

स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे डॉ. रेड्डीजने रशियासोबत करार केला आहे. यानुसार या लसीचे उत्पादन भारतात केले जाणार आहे.

रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत 948 रुपये प्रति डोस आहे. परंतू त्यामध्ये 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे या लशीची किंमत 995.4 रुपये होत आहे. यामुळे 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा डोस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात या लसीचे उत्पादन सुरु झाले की या लसीची किंमतही कमी होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.  सरकारने  स्पुतनिक लस देशभरातील बाजारांत उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले होते. भारतात सध्या देण्यात येत असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनपेक्षा रशियाची लस जास्त परिणामकारक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.