प्रभात वृत्तसेवा
पुणे – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुणे, अहमदनगर, नाशिक या कार्यक्षेत्रातील 164 महाविद्यालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महाविद्यालयांनी 15 फेब्रुवारीपूर्वी ही कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे.
विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. मागील वर्षी देखील यासाठी विद्यापीठाकडून दोन कोटीहून अधिक निधीचे वितरण करण्यात आले होते.
दरम्यान, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे केवळ विद्यापीठ व वर्तुळाभोवती मर्यादित न राहता व्यापक स्वरूपात, ग्रामीण भागातही त्याची तेवढीच अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी या संधीचा लाभ घेत व्यापक स्वरूपात याची माहिती सर्वांना उपलब्ध करून द्यावी व योग्य अंमलबजावणी करावी, असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.