शिवेंद्रराजेंच्या मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना
सातारा – अतिवृष्टीमुळे सातारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यापासून खड्डेयुक्त रस्त्यांच्या समस्येमुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. आता पावसाने उघडीप दिली असून आचारसंहिताही शिथील झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत, अशी सूचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेचे मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. सातारा शहरारबोर तालुक्यातील आणि जावळी तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याही रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे, अशी सूचनाही शिवेंद्रराजे यांनी दिली आहे.
सातारा शहरात ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. या कामास प्रारंभ झाल्यापासून ठरावीक रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची कामे करता आली नाहीत. त्यानंतर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळेही कामे सुरू करता आली नाहीत. आता पावसाने उघडीप दिली असून आचारसंहिताही शिथील झाली आहे. त्यामुळे सातारा शहरातील रस्त्यांची कामे हाती घेण्याची सूचना शिवेंद्रराजे यांनी सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिली आहे. नगरोत्थानमधून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी मंजूर झालेल्या 50 कोटी निधीचा विनियोग करावा. या रस्त्यांच्या कामांच्या निविदा व अन्य शासकीय सोपस्कार त्वरित पूर्ण करून लवकरात लवकर कॉंक्रीट रस्ते तयार करुन नागरिकांना दळणवळणाची दर्जेदार सोय उपलब्ध करावी, अशी सूचना शिवेंद्रराजे यांनी दिली आहे.
जोरदार पाऊस, अतिवृष्टीमुळे सातारा शहर, तालुका आणि जावळी तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. संपूर्ण मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी सूचनाही शिवेंद्रराजेंनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सातारा शहरातील रस्त्यांची कामे त्वरित सुरू करावीत. ही कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी अहवाल तयार करावा. नागरिकांनीही या कामांवर लक्ष ठेवावे. निकृष्ट काम झाल्यास तक्रारी कराव्यात, असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी केले आहे.