आंबील ओढ्यासाठी पालिकेचा कृती आराखडा

300 कोटींचा खर्च : टप्प्या टप्प्याने करणार काम

पुणे – दक्षिण पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबील ओढ्याला पूर आला होता. त्याचा फटका 10 हजारांहून अधिक पुणेकरांना बसला असून कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. भविष्यात पुन्हा ही स्थिती उद्भवण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने पालिका प्रशासनाकडून आंबील ओढ्याच्या सुधारणेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली.

मागील महिन्यांत दक्षिण पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कात्रज तलावातून निघणाऱ्या आंबील ओढ्याला महापूर आला होता. या पुराने धनकवडी, तावरे कॉलनी, पद्मावती, सहकारनगर, कात्रज, आंबील ओढा, दत्तवाडी परिसरातील शेकडो घरांमध्ये पूराचे पाणी घुसले. तसेच कोट्यवधींचे नुकसानही झाले आहे. वातावरणातील बदल तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे असे प्रकार पुन्हा घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन पुढील पावसाळ्याचा धसका महापालिका प्रशासनाने आतापासूनच घेतला असून त्यासाठी आतापासूनच तातडीने काही कामे हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

एसआरए योजना मार्गी लावणार
ओढ्याच्या बाजूला असलेल्या टांगेवाला कॉलनी आणि आंबील ओढा येथील एसआरए योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने 4 वेगवेगळे प्रस्ताव तयार केले आहेत. या दोन्ही ठिकाणच्या एसआरए रखडल्या असून या भागातच नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी असून त्याबाबत पुढील काही दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

सर्वाधिक धोका असलेल्या भागात आधी काम सुरू करणार
आंबील ओढ्यासाठी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार, ओढ्याचे अतिक्रमण काढणे, सिमाभिंत बांधणे, खोली वाढविणे तसेच ओढ्यावर येणाऱ्या पुलांची उंची वाढविणे या कामांचा समावेश आहे. मात्र, एकाचवेळी ही कामे सुरू करायची झाल्यास पालिकेस त्यासाठी 300 कोटींचा खर्च अपेक्षीत आहे. तसेच पालिकेकडे यावर्षी तेवढी तरतूदही नाही. त्यामुळे टप्प्या टप्प्याने हे काम केले जाणार आहे. त्यासाठी पुन्हा पूर आल्यास कोणत्या भागास सर्वाधिक धोका आहे ही बाब लक्षात घेऊन त्या भागात तातडीने काम केले जाणार आहे. हे काम ड्रेनेज आणि पथ विभागाच्या माध्यमातून केले जाणार आहे. तर ज्या ठिकाणी महापालिकेच्या जागा आहेत त्या बाजूला ओढ्यात सुमारे 6 ते 7 फूट उंचीच्या सिमाभिंत बांधून तो भाग सुरक्षित केला जाणार आहे. यावर्षी प्रामुख्याने या पुलावरील कल्वर्ट बांधणे, पूल उंच करणे, ओढ्याची खोली वाढविणे ही कामे केली जाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.