निमोणे -शिरूरच्या पूर्वभागात करोनाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या परिसरातील हॉटेल्स व ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच निमोणे, गुनाट, चिंचणी व निर्वी या परिसरात गावठी दारू विक्री जोमात असल्याचे दिसून
येत आहे.
शिरूरच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग वाढला आहे. दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शिंदोडी येथे एका किराणा दुकानातही दारू मिळत असल्याने तळीरामांचे फावले आहे. गेली अनेक वर्षे हा किराणा दुकानदार गावठी दारू विक्री करत आहे; परंतु वारंवार तक्रार करूनही पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
शिंदोडी-निमोणे रस्त्यावर कुऱ्हाडवाडी येथेही एकजण दारू विक्री करत असून त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर तळीरामांची गर्दी असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
निमोणे परिसरात अवैध दारू विक्री सुरू आहे. याबाबत नागरिकांमधून तक्रारी होत आहेत. या भागात दारू विक्री करणाऱ्या लोकांवर लवकरच कारवाई करणार आहे.
– प्रवीण खानापुरे, पोलीस निरीक्षक, शिरूर.