बेकायदा पत्ते क्‍लबचा “डाव’ जोरात

संत तुकारामनगर, महेशनगरमधील चित्र; पोलिसांचा कारवाईकडे कानाडोळा
पिंपरी  – संत तुकारामनगर, महेशनगर भागात पत्ते क्‍लबच्या नावाखाली बेकायदेशीर जुगार अड्डे सुरू आहेत. मुंबई पोलीस अधिनियमानुसार असे क्‍लब चालविण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे. परंतु, विनापरवाना राजरोसपणे हे क्‍लब सुरू असल्याचा आरोप परिसरातील रहिवासी करीत आहेत. त्यामुळे अवैध धंदेमुक्त शहर संकल्पनेला हरताळ फासला जात असून नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई त्यास चाप लावणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांचे प्रमाण पाहता त्यावर नियंत्रणासाठी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. आर. के. पद्मनाभन यांना पहिले पोलीस आयुक्त होण्याचा मान मिळाला. त्यांनी अवैध धंदेमुक्त शहराचे सूतोवाच केले होते. परंतु, पोलिसांच्याच कृपाशिवार्दामुळे अवैध धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचे भोसरी व परिसरातील वाढत्या अवैध धंद्यांवरुन पहायला मिळत आहे.

पद्मनाभन यांची नुकतीच बदली झाली. त्यांच्या जागी संदीप बिष्णोई यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली. त्यांच्यासमोर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान असताना बेकायदा धंद्यांचा प्रश्‍नही ऐरणीवर आहे.
संत तुकारामनगर परिसरात पत्त्यांचा क्‍लब जोरात चालतो. मुंबई पोलीस अधिनियमानुसार पत्ते क्‍लबसाठी (कार्ड रूम) परवानगी दिली जाते. त्यासाठी स्वतंत्र नियम देखील आहेत. मात्र, पोलिसांकडून पत्त्याच्या गुत्त्यांवर कारवाई होत असली तरी क्‍लबच्या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांकडे कारवाईसाठी कानाडोळा केला जात आहे.

पत्ते क्‍लबच्या नावाखाली सर्रास जुगार अड्डे सुरू आहेत. याठिकाणी पत्त्यांच्या 52 पानात हा खेळ चालतो, 13 पानी, 3 पानी असा डाव चालतो. पपलू, टपलू, बाजी अशी पानांची वेगवेगळी नावे आहेत. पत्त्याच्या एकेका पानावर पैसे लावले जातात. क्‍लब चालवणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक टेबलावर चालणाऱ्या धंद्यांवर कमिशन मिळते.

दररोज लाखोंची उलाढाल करणारा हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खेळायला येणाऱ्यांना नाष्टा, जेवण, मद्य जाग्यावर मिळत असते. मटका, जुगार हा चिठ्ठीवर खेळला जातो. परंतु, यामध्ये सर्व व्यवहार रोखीने केला जातो. याठिकाणी वादावादीचे प्रकार घडत आहेत. यामुळे परिसरातील सुरक्षितता धोक्‍यात आली आहे.

ऑनलाईन जुगाराचे प्रमाण वाढतेयं
मोबाईलवर पत्त्यांचे अनेक ऍप उपलब्ध आहेत. त्यातूनही पैसे मिळतात. हे सर्व व्यवहार ऑनलाईन होत आहेत. बसल्याजागी काही मिनिटांत पैसे मिळत असल्याने तरुण पिढी जुगाराच्या आहारी जात आहे. परंतु, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. एकवेळ जुगार अड्ड्यांवर, क्‍लबवर पोलीस कारवाई करतील परंतु, ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांना लगाम कोण लावणार असा प्रश्‍न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)