सातारा -सातारा जिल्हा बॅंक सभासदांची अर्थवाहिनी आहे. ती उत्तमरित्या चालली पाहिजे. जिरवायची असेल तर एक वेळ माझी जिरवा, पण सभासदांची नको, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केले.
जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने उदयनराजे यांनी मागितलेली माहिती न्यायप्रविष्ट बाब म्हणून नाकारली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या उदयनराजे यांनी शनिवारी यासंदर्भात बॅंक प्रशासनाला जाब विचारण्याची भूमिका घेतली. तेव्हा बॅंकेच्या पोर्चमध्ये पुन्हा उदयनराजे यांनी पत्रकारांसमोर टोलेबाजी केली.
दाढी व मिशीवर हात फिरवत लयं मस्ती आलीयं वाटतं.., असे म्हणत उदयनराजे म्हणाले, “माझी विनंती आहे, मी तुमच्या कोणाचा दुष्मन नाही. पण जिरवायची असेल तर माझी जिरवा. सभासदांची नको. कारण जिल्हा बॅंक सभासदांची अर्थवाहिनी आहे.’ जिल्ह्याचे राजकीय निर्णय जिल्ह्यातच व्हायला हवेत, बारामतीच्या कलाने निर्णय घेणारे संचालक हवेत कशाला, असा परखड सवाल त्यांनी केला.
उदयनराजे म्हणाले, “”तुम्ही इकडच्यांना बघून घ्या, तुम्ही तिकडच्या बघून घ्या, टाईट करून जिरवू. माझी नका जिरवू, असे सांगत उदयनराजे म्हणाले, माझी विनंती आहे, मी तुमच्या कोणाचाही दुष्मन नाही. हात जोडून विनंती करतो, बॅंक शेतकरी सभासदांची आहे. त्यांच्यावतीने मी विनंती करतो ही बॅंक सभासदांची ही अर्थवाहिनी आहे. त्यामुळे सभासदांची जिरवू नका. जिरवायची असेल तर माझी जिरवा. मी हे सर्व तडजोडीसाठी करत नाही, यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही.
मी बसायला पाहिजे ना? ठीक आहे. मी हे करत नाही, ते करत नाही. चला… मला पॅनेलमध्ये घ्या. पण, ते कोण मला पॅनेलमध्ये घेणारे. मी ठरवतो कुठे जायचे ते. काय होईल ते होईल, मी परिणामाला घाबरत नाही. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. संबंधितांनी सगळ्यांनी समजून घेऊन यातून बोध घ्यावा.” मी शेतकऱ्यांच्या हिताचे बोलत आहे, असे सांगून उदयनराजे जिल्हा बॅंकेतून आपल्या समर्थकांसह निघून गेले.