मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांवर खोटे-नाटे आरोप करणे बंद करावा. त्यांनी जुनी थडगी उकरू नयेत. कारण ती आम्ही उकरली तर तुमच्या पापांचेच सांगाडे त्यात जास्त सापडतील, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, ठाकरे कुटुंबियांवर सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत आम्ही काही बोलावे असे कोणतेही महान कार्य त्यांनी केलेले नाही. ते जे काही करत आहेत किंवा करतील त्याकडे त्यांचा पक्षही गांभीर्याने पाहत नाही. अशा विधानांमुळे आपल्याच पक्षावरील लोकांचा विश्वास उडतो याचे त्यांनी भान ठेवले पाहिजे.
तसेच, सोमय्यांनी खोटे-नाटे आरोप करणे बंद करावे, जुनी थडगी उकरायची म्हटले तर आम्हालाही उकरता येतात. आम्ही ती उकरली तर त्यात तुमच्याच पापांचे सांगाडे जास्त सापडतील, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
विरोधकांनी वर्षभरात महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी अनेक ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला पण सरकारला थोडेही खरचटले नाही. त्यामुळे त्यांनी आता ऑपरेशनची भाषा बंद केली पाहिजे, असेदेखील संजय राऊत यांनी म्हंटले आहे.