कार्यालयीन बैठकीत हवेली प्रांताधिकाऱ्यांचा सज्जड इशारा : अधिकाऱ्यांची झाडाझडती
थेऊर – शेतकरी व खातेदारांच्या सात- बारावरील झालेल्या चुका तात्काळ दुरुस्त करा, गौण खनिज वसुली, अकृषिक कर एनए पीएमओ किसान योजना यादी, सातबारा संगणकीकरण, ऑनलाइन फेरफार, तलाठी कार्यालयातील इतर प्रलंबित कामे यासह अन्य कामात कोणतीही कारणे अथवा सबबी न सांगता तातडीने कामांची आकडेवारी द्या.
यामधील विलंब खपवून घेतला जाणार नाही. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी सर्व तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना कार्यालयीन बैठकीमध्ये नुकताच दिला आहे.
हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी कार्यालयात सर्व तलाठी व मंडलाधिकारी यांची बैठक बोलावून कार्यालयीन कामकाजाचा वेगवान आढावा घेतला. दि. 1 रोजी दुपारी सुरू झालेली कार्यालयीन बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये तलाठी भाऊसाहेब, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली.
यावेळी हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, नायब तहसीलदार संजय भोसले, निर्मला मखरे, उरुळी कांचनचे मंडलाधिकारी दीपक चव्हाण, थेऊरच्या मंडलाधिकारी गौरी तेलंग, हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरुमुल्ला, वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, कळस – धानोरीचे मंडलाधिकारी बाळासाहेब शेंडगे, कोथरूडचे मंडलाधिकारी प्रमोद भांड, खेड- शिवापूरचे मंडलाधिकारी एस. पी. पाटील, खडकवासलाचे मंडलाधिकारी रोहिदास जाधव, अन्य अधिकारी
उपस्थित होते.
प्रत्येक सर्कल व सजातील कार्यक्षेत्रातील कामाचा आढावा घेण्यात आला. महसूल वसुलीचेही वाढीव उद्दिष्ट सर्कलप्रमाणे देण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा कलम 155 अन्वये सातबारा संगणकीकरण दुरुस्तीची आकडेवारी घेण्यात आली.
ऑनलाइन पद्धतीने सातबारा दुरुस्ती सोपी असल्याने तलाठी स्तरावरील 155 ऑनलाइन दुरुस्तीच्या रिक्वेस्ट व तहसील कार्यालयात आलेल्या ऑनलाइन दुरुस्तीच्या रिक्वेस्ट याविषयी तात्काळ काम करण्यासाठी काही प्रकरणांमध्ये आवश्यकता असलेले नोटिसा बजावण्यात येऊन 7/12 दुरुस्ती करण्याचे फर्मान प्रांताधिकारी यांनी संबंधितांना बजावले.
कोणतीही कारणे अथवा सबबी सांगू नयेत. विनातक्रार खातेदार शेतकऱ्यांच्या कामाचा निपटारा करा, कामासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे.
हवेलीमधील संगणकीकरण सातबारा, हस्तलिखीत सातबारा संगणकीकरण करताना झालेल्या चुका ऑनलाइन दुरुस्ती करणे, गौणखनिज उत्खनन, वाहतूक व रॉयल्टी यांचा महसूल, अकृषक कर, पीएमओ किसान संदर्भातील कामे इत्यादीचा सजाप्रमाणे आढावा घेतला आहे. महसूली सजांमधील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत. यामध्ये कार्यविवरणात तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडून हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
– सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी, हवेली.