नेवासा (शहर प्रतिनिधी) – नेवासा शहरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कचरा संकलनच्या गाड्या बंद असल्याने साफसफाई कामगार आक्रमक होत सामाजिक कार्यकर्ते संजय सुखदान यांच्या नेतृत्वाखाली कचऱ्याने भरलेल्या गाड्या नगरपंचायतसमोर उभ्या करत सदरचा कचरा आवारात टाकण्याचा इशारा देत ठिय्या आंदोलन केले व जाब विचारला. परंतु सदर आंदोलनाकडे कार्यकारी अधिकारी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी पाठ फिरवल्याने संतप्त आंदोलकांनी निषेध नोंदवत कार्यकारी अधिकारी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना जोडे मारो आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला, तसेच सोमवारी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला.
नेवासा शहरात दहा ते पंधरा दिवसापासून कचरा गोळा होत नसल्याने शहरात मोठा कचरा साचलेला आहे. यासाठी गाड्या येत नसल्याने संजय सुखदान यांनी स्वखर्चाने शनिवारी शहरात पाच कचरा गाड्या फिरून शहरातील कचरा या गाड्याद्वारे गोळा करून त्यागाड्या नगरपंचायतीच्या आवरात आणून उभा केल्या. जोपर्यंत नगराध्यक्ष व उनगराध्यक्ष समोर येऊन यावर मार्ग काढत नाही. तोपर्यंत येथून हलणार नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी सुखदान म्हणाले, शुक्रवारी जुन्या ठेकेदारास काही दिवस परत कचरा गोळा करण्यास सांगितले. मात्र शनिवारी त्यास हे काम करण्यास काही पदाधिकाऱ्यांनी मज्जाव केला. कार्यकारी अधिकारी समीर शेख, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने अखेर संतप्त आंदोलकांनी निषेध नोंदवत कार्यकारी अधिकारी,नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना जोडे मारून आंदोलन केले.
आंदोलनाच्या नौटंकीचा लवकरच पर्दाफाश : पाटील
कचऱ्या संदर्भात चालू असलेले आंदोलन हे केवळ राजकीय स्वार्थासाठी केले जात असून कंत्राटी कामगार पगार वाढीचा अन् नगर पंचायतचा काही संबध नाही, वास्तवात आंदोलनकर्त्याला कंत्राटी कामगारांचा कळवळा असता तर गेल्या दिड वर्षापासून त्यांची सत्ता असताना पगारवाढीचा हट्ट का नाही केला, केवळ एक महिन्यापुर्वी क्रांतिकारीची सत्ता येताच चालू कामकाजात खोडा घालून जनतेची दिशाभूल करण्यासाठी या आंदोलनाचा फार्स केला जात आहे. या सगळ्या आंदोलनाच्या नौटंकीचा लवकरच पर्दाफाश करून सर्व जनतेच्या समोर भांडाफोड केला जाणार असल्याचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी सांगीतले.
नगरपंचायत यंत्रणेमार्फत कर्मचाऱ्यांकडून शहरातील साफसफाई चालू आहे. कर्मचाऱ्यांचा पगारवाढ हा ठेकेदाराचा प्रश्न आहे. तसेच डम्पिंग ग्राउंड इतरत्र हलवण्यासाठी लवकरच सर्वांची एकत्र बैठक घेऊन तोडगा काढू. त्यासाठी सोमवारी तातडीची बैठक घेऊ..
योगिता पिंपळे, नगराध्यक्ष.