भिगवण येथील स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद ः भिगवणमधील वातावरण सायकलमय
भिगवण – सायकल चालवा आणि आरोग्य सुधारा चा नारा देत येथील सायकल क्लबच्या वतीने आयोजित सायकल मॅरेथॉन स्पर्धेला भिगवण व परिसरातील विद्यार्थी, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायकल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुमारे 350 जणांनी सहभाग घेतला.सायकल मॅरेथॉनमुळे रविवारी भिगवणमधील वातावरण सायकलमय झाले होते.
येथील सायकल क्लबच्या वतीने भिगवण बस स्थानक ते बिल्ट कंपनी दरम्यान सायकल मॅरेथॉनचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या सायकल मॅरेथॉनचे उद्घाटन भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, माजी सरपंच पराग जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप वाकसे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सायकल मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील 350 विदयार्थी, महिला व नागरिकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा समारोप बिल्ट कंपनीमध्ये करण्यात आला. बिल्ट कंपनीचे प्रमुख नागेंद्र भट्ट, व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे, भारतीय जैन संघनटेचे जिल्हाध्यक्ष सचिन बोगावत, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून अकरा विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात आली. रणजित जाधव, नितीन कदम, संदीप वाकसे, प्रवीण वाघ, किरण रायसोनी, बंटी देशमुख, डॉ. अमोल खानावरे, डॉ. विशाल कोठारी, राजेंद्र ठवरे, डॉ. प्रवीण ढोले, बबन घाडगे यांच्यावतीने विजेत्यांना सायकल भेट देण्यात आल्या.
याप्रसंगी काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवारी करणाऱ्या राजेंद्र ठवरे, सोनाली ठवरे व दराडे कुटुंबियांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सायकल क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर यांनी केले. सूत्रसंचालन रणजीत भोंगळे यांनी केले तर प्रवीण वाघ यांनी आभार मानले.
केशव भापकर, अर्जुन तोडकर, संजय चौधरी, कमलेश गांधी, औदुंबर हुलगे, अकबर तांबोळी, डॉ. जयप्रकाश खरड, संतोष सवाणे, सचिन जामले यांनी विशेष परिश्रम घेतले. बिल्ट कंपनीच्या वतीने सहभागींना अल्पोपहार तर शुभम पेट्रोलिय व भारत पेट्रोलियम यांचे वतीने टी-शर्ट व कॅप आदी सहकार्य लाभले.