मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सध्या पक्ष संघटनेच्या मोर्चेबांधणीवर लक्ष देताहेत. राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन अमित ठाकरे आगामी निवडणुकांसाठी तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. अंबरनाथमध्ये मनसेतर्फे संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अमित ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याबाबत भाष्य केले.
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची त्यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर भेट घेतली होती. त्यानंतर मनसेला शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर आता अमित ठाकरेंनी याबाबत भाष्य केल्याचे समजते. या दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे यांनी मुंबई ते अंबरनाथ असा लोकल प्रवास देखील केला.
अमित ठाकरेंनी अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात दर्शन देखील घेतले. त्यानंतर मनसेला मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांबाबत पत्रकारांनी अमित ठाकरेंना विचारले असता ते मिश्किल पणे म्हणाले,“गृहमंत्री पद देणार असतील, तर सत्तेत सहभागी होऊ पण ते देत नाहीत ना”. अमित ठाकरे यांनी सध्या पूर्णपणे लक्ष पक्ष संघटनेवर केंद्रित केल्याचे पाहायला मिळते.