#WTC21 Final : जागतिक वर्चस्वाची आजपासून कसोटी

साउदम्पटन – केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड व विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारत यांच्यात आजपासून आयसीसी कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यातील विजयासह जागतिक कसोटी क्रिकेटवर वर्चस्व प्रास्थापित करण्यासाठीच दोन्ही संघ मैदानात उतरतील.

हा सामना साउदम्पटनच्या रोझ बाऊल मैदानावर होत असून येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच उर्वरीत तिनही दिवस स्विंग आणि फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळेल असे सांगण्यात येत आहे. दोन्ही संघांची गोलंदाजी तुल्यबळ आहे. मात्र, न्यूझीलंडने या सामन्यापूर्वी यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली असल्याने त्यांची बाजू जास्त वरचढ राहण्याची शक्‍यता आहे. त्यांचा कर्णधार विल्यमसन दुखापतीतून पूर्ण सावरला असून अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी ठरू शकतो.

गेल्या काही महिन्यात त्याला मोठी खेळी करण्यात यश आलेले नसले तरीही महत्त्वाच्या लढतीत वर्चस्व राखण्याचे त्याचे सातत्य वादातीत आहे. त्याच्यासह रॉस टेलर, टॉम ब्लंडल, कॉलिन डी ग्रॅण्डहोम, मॅट हेनरी, टॉम लॅथम अशी भक्कम फलंदाजी त्यांच्याकडे आहे. गोलंदाजीबाबतही त्यांची बाजू भारतीय संघापेक्षा वरचढ आहे. ट्रेन्ट बोल्ट, टीम साउदी, काएल जेमिसन, नेल वॅगनर, एजाज पटेल अशी गोलंदाजीतील विविधताही त्यांच्याकडे आहे.

कोहली आणि कंपनीची फलंदाजी हीच ताकद आहे. कर्णधार कोहलीला गेल्या दीड वर्षांत मोठी खेळी करता आली नसली तरीही त्याची उणिव सलामीवीर रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा व ऋषभ पंत यांनी सातत्याने धावा केल्या आहेत. त्यांना रवीचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजाने सार्थ साथ दिली आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांना जसप्रीत बुमराह, महंमद शमी, इशांत शर्मा यांच्याविरुद्ध जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर अश्‍विन व जडेजा यांची फिरकीही त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. अर्थात या दोघांची गोलंदाजी मोठ्या प्रमाणात खेळपट्टीच्या स्वरुपावर अवलंबून आहे.

भारतीय संघात रोहितसह डावाची सुरुवात करण्यासाठी शुभमन गिलला स्थान देण्यात आले असून त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड यांचा मिलाफ या फलंदाजाकडे असल्याचे सांगितले जाते. त्याने आजवर अनेकदा आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे. मात्र, इंग्लंडच्या वातावरणात त्याने धावा केल्या तर आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला स्थान मिळेल व या अंतिम लढतीतही न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान उभे राहील.

कॉनवे धोकादायक ठरेल

न्यूझीलंडचा नवोदित फलंदाज डेवन कॉनवे हा तुफान भरात असून तोच भारतीय संघासाठी सर्वात धोकादायक ठरू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने विक्रमी द्विशतकी खेळी केली होती. तसेच त्याने संपूर्ण मालिकेत सातत्याने धावा केल्या असून आता भारतीय गोलंदाज त्याला रोखण्यात यशस्वी होतील का यावरच या सामन्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

पावसाचे सावट

इंग्लंडमध्ये सध्या संमिश्र वातावरण आहे. अनेकदा प्रखर उन पडते तर अनेकदा अचानक पाऊसही येतो. असाच व्यत्यय इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतही आला होता. तसाच या सामन्याच्या पाचही दिवशी पावसाची शक्‍यता येथील हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.