ICC Test Ranking 2024 : आयसीसीने बुधवारी नवीनतम कसोटी क्रमवारी जाहीर केली. धरमशालामध्ये शतक झळकावणारे रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) यांना कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत फायदा झाला आहे. रोहित (751 रेटिंग)पाच स्थानांची झेप घेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी यशस्वी जैस्वालनेही ( Yashasvi Jaiswal ) दोन स्थानांनी सुधारणा करत 740 रेटिंगसह आठवे स्थान मिळवले आहे.
विराट कोहलीला (737 रेटिंग)एका स्थानाचा फटका बसला असून तो नवव्या स्थानावर घसरला आहे. टीम इंडियामधून बराच काळ बाहेर असलेला ऋषभ पंतही एक स्थान गमावून 15व्या स्थानावर घसरला. धरमशाला कसोटीत शानदार शतक झळकावणाऱ्या शुभमनने 11 स्थानांची झेप घेतली असून तो 21व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा केन विल्यमसन (859 रेटिंग)अव्वल स्थानावर आहे. तर, इंग्लंडचा जो रूट (824 रेटिंग)दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम (768 रेटिंग)तिसऱ्या तर न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल (768 रेटिंग)चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (757 रेटिंग) पाचव्या स्थानावर आहे.
अष्टपैलूंमध्ये जडेजा नंबर 1
कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा 444 रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहे. तर अश्विन 322 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या तर इंग्लंडचा रूट चौथ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा जेसन होल्ड पाचव्या स्थानावर आहे. त्याचवेळी अक्षर पटेलची एका स्थानावर घसरण झाली आणि तो सहाव्या स्थानावर घसरला.