पाटणा – लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी रविवारी जाहीर केले की ते जमुई या लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी त्यांचे वडिल रामविलास पासवान यांच्या हाजीपुर मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी दावा केला होता.
परंतु तो मतदारसंघ सोडण्यास त्यांचे काका पशुपती पारस यांनी नकार दिला होता. त्यामुळे लोकजनशक्ती पक्षाच्या या दोन नेत्यांमध्ये हाजीपुर विषयी तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. तथापि, आता चिराग पासवान यांनी जमुईतूनच लढण्याचे स्पष्ट केल्याने आता हा वाद मिटेल, असे सांगण्यात येत आहे.
चिराग पासवान म्हणाले, मी राजकारणावर जास्त भाष्य करणार नाही. कोण कोठून निवडणूक लढवणार यासारख्या गोष्टींना महत्त्व देत नाही. पण मी जमुईच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की या जिल्ह्याला बिहारमधील सर्वात विकसित जिल्हा बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी येथे लहानपणी आलो आहे आणि मी म्हातारा होईपर्यंत येथेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.