I phone Hack : आयफोन हॅक प्रकरणी आयटी मंत्रालयाने अॅपलला नोटीस पाठवली आहे. आयटी मंत्रालयाने ‘राज्य प्रायोजित’ हल्ल्याच्या आरोपांवर अॅपलकडून उत्तर मागणारी नोटीस पाठवली आहे. सरकारने ऍपलला विचारले आहे की, हा ‘राज्य प्रायोजित’ हल्ला असल्याचा निष्कर्ष कसा आला?
आयटी सचिव एस कृष्णन यांनी गुरुवारी सांगितले की, सीईआरटी-इनने अॅपलlने त्यांना पाठवलेल्या चेतावणी संदेशाबद्दल विरोधी खासदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात कंपनीला नोटीसही पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आयटी सचिव एस कृष्णन म्हणाले,’CERT-In ही संगणक सुरक्षा समस्यांना प्रतिसाद देणारी राष्ट्रीय नोडल एजन्सी आहे. अनेक विरोधी नेत्यांनी मंगळवारी दावा केला होता की, त्यांना Apple कडून त्यांच्या iPhones वर ‘सरकार प्रायोजित हॅकिंगच्या प्रयत्नांबद्दल’ चेतावणी संदेश मिळाला होता. हॅकिंगच्या या कथित प्रयत्नासाठी त्यांनी सरकारला जबाबदार धरले.
तत्पूर्वी, विरोधी पक्षनेत्यांनी केलेले आरोप सरकारने तातडीने फेटाळून लावले. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘सरकार या आरोपांची सखोल चौकशी करेल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल, शशी थरूर, पवन खेडा, सुप्रिया श्रीनेट आणि टीएस सिंगदेव, शिवसेनेच्या (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, आम आदमी पार्टी (आप) राघव चढ्ढा, सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘राज्य प्रायोजित हल्ला’चा संदेश मिळाल्याचा दावा केला होता.’