नवी दिल्ली – आपली प्रकृती एकदम स्वस्थ असून आपल्याला कोणताही आजार नाहीं असा खुलासा गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना फोन करून किंवा त्यांच्याशी अन्य माध्यमातून संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. तसेच ते गेले अनेक दिवस माध्यमांमध्ये कुठेच न दिसल्याने त्यांच्या विषयी अनेक अफवाही पसरल्या होत्या. पण स्वत: अमित शहा यांनी आज एक सविस्तर ट्विट करून आपण सुखरूप असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, गेले काही दिवस आपल्या प्रकृती विषयी अनेक अफवा पसरवल्या गेल्या. काहींनी माझ्या मृत्यूचीही मनोकामना केली. पण मी सध्या कामात खूप व्यस्त असल्याने या बाबींकडे मी लक्ष दिले नाही, हे लोक आपल्या कल्पनांचा अविष्कार करून आनंद घेत असतील तर त्यात बाधा का आणावी म्हणून मीही गप्प होतो. पण अलिकडे माझ्या पक्षाच्याच अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या विषयी चिंता व्यक्त केल्यानंतर त्यांच्यासाठी मी हा खुलासा करू इच्छितो की मला कोणताही आजार नाही मी एकदम स्वस्थ आहे.
हिंदु मान्यतेनुसार एखाद्याच्या मृत्यूची कोणी कामना केली तर त्या व्यक्तीला खूप आयुष्य मिळत असते. त्यामुळे अशा फालतू बाबींकडे लक्ष न देता आपण आपले काम करावे आणि मलाही काम करू द्यावे असे आवाहनही त्यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना केले आहे. ज्यांनी माझ्या विषयी या अफवा पसरवल्या त्यांच्या विषयीही माझ्या मनात सद्भावनाच आहेत असेही अमित शहा यांनी आपल्या ट्विटरवरील निवेदनात म्हटले आहे.