सोलापूर – राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांचे मत शिवसेनेच्या संजय पवार यांना मिळाले नाही ,असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय शिंदे फुटल्याचा आरोप झाल्यामुळे आता थेट आघाडी सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खासदार संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना आमदार संजय शिंदे म्हणाले की आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता. तुमचे नेते आमच्या सोबत ठेवले होते. सूचनेप्रमाणे आम्ही मतदान केले आहे. पराभवानंतर आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही घोडेबाजारमधले आहोत का ? मी हरभरे खाणारा नाही, स्वाभिमानी नेता आहे.
हे राज्यातील सर्व नेत्यांना माहीत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही बिनविरोध पाठिंबा दिला आहे. मी विकला जाणारा नेता नाही .मला कितीवेळा शिवसेनेची ऑफर होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण तक्रार करणार असल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले.