पुणे – महापालिकेकडून मिळकतकराच्या उत्पन्नवाढीसाठी मिळकत वापरात बदल झालेला आहे का हे पाहण्यासाठी काही खासगी कंपन्या नेमल्या होत्या. या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर न जाताच स्वत: मिळकतधारक राहत असतानाही भाडेकरू राहत असल्याचे चूकीचे अहवाल दिले आहेत.
परिणामी अनेक सर्वसामान्य नागरिकांनी 40 टक्के कर सवलत रद्द झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारे चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर कंपन्यांवर कारवाई करावी तसेच प्रत्यक्ष जागेवर पाहणी करूनच महापालिकेने सवलत रद्द करावी त्या शिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. तसेच अशा प्रकारचे चुकीचे अहवाल देणाऱ्या ठेकेदार कंपन्यांची बिले तातडीनं थांबवावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही सुतार यांनी दिला आहे.
सुतार म्हणाले की, मिळकतकर हे महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. करोना संकटातही पुणेकरांनी कोणतेही कारण न देता तब्बल दोन हजार कोटींचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. मात्र, आता महापालिका या कंपन्यांच्या कामाचा अहवाल दाखवित शेकडो पुणेकरांची मिळकतकर सवलत रद्द करत असून पुणेकरांवर 40 टक्के सवलत वसूलीचा बोजा टाकत आहे.
त्यामुळे असे चुकीचे काम करणाऱ्या सार आयटी व सायबर टेक या कंपन्यांना काळया यादीत टाकावे अशी मागणीही सुतार यांनी केली आहे. तसेच आता ज्या निवासी मिळकतीत भाडेकरू आहेत म्हणून कर सवलत रद्द केली त्याची आधी पालिकेने प्रत्यक्ष तपासणी करावी मगच पुढील निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.