जयपूर – राजस्थानमधील राज्यसभेच्या चार जागांवर मतदान झाल्यानंतर निकाल जाहीर झाले आहेत. चारपैकी तीन जागा काँग्रेसने तर एक जागा भाजपने जिंकली. दरम्यान राजस्थानच्या राजकारणात शोभाराणी कुशवाह अचानक चर्चेत आहेत. शुक्रवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजप आमदार शोभाराणी यांनी क्रॉस व्होटिंग करताना काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला. शोभाराणी यांच्यावर तत्काळ कारवाई करत भाजपने त्यांना पक्षातून निलंबित करून नोटीस पाठवून सात दिवसांत उत्तर मागितले आहे.
शोभाराणी कुशवाह यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची प्रक्रियाही भाजपने सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, 9 जून रोजी व्हीप जारी करून भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले होते. असे असतानाही 10 जून रोजी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शोभाराणी यांनी पक्षाच्या अधिकृत एजंटला आपले मत दाखवले असता त्यांनी आपले मत पक्षाच्या उमेदवाराला न देता काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना दिल्याचे दिसून आले. व्हीपचे उल्लंघन करून तुम्ही घोर अनुशासनहीनता दाखवली आहे, असे पत्र भाजपने शोभाराणी यांना दिले. हे भाजपच्या घटनेच्या कलम 25 मधील नियम 10-ब चे उल्लंघन आहे. पक्षाने विचारले आहे की, तुम्ही 7 दिवसांत सांगा की, तुम्हाला पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित का करण्यात येऊ नये?
काँग्रेसने घेतला मजबुरीचा फायदा –
शोभाराणी कुशवाह यांच्या मजबुरीचा फायदा काँग्रेसने घेतल्याचे गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे. मात्र काहीही झाले तरी शोभाराणी यांनी पक्षशिस्तीचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव ओम पाठक यांनी आमदारांना लिहिलेल्या पत्रात पक्षाने म्हटले आहे की, प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्यासह राजस्थान युनिटकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी आमदाराला तात्काळ निलंबित केले आहे.
कोण आहेत शोभाराणी –
शोभाराणी कुशवाह या धौलपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार आहेत. त्या बनवारीलाल कुशवाह यांच्या पत्नी आहेत, ज्यांनी बसपाच्या तिकिटावर ढोलपूर विधानसभेची निवडणूक जिंकली होती. बनवारीलाल कुशवाह हे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यानंतर 9 एप्रिल 2017 रोजी या जागेवर पोटनिवडणूक झाली, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी शोभराणी यांना भाजपचे तिकीट दिले. शोभाराणी वसुंधरा राजेंच्या जवळच्या मानल्या जातात.