राजगुरूनगर -राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात बुधवारी (दि. 25) अचानक दंगल झाल्याने क्रीडा संकुलात उपस्थित असलेले खेळाडू व इतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, खेड पोलिसांनी दंगाकाबूची रंगीत तालीम असल्याचे समजल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
कोरेगाव भीमा येथे दि. 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम असतो. येथे लाखो दलित बांधव हजेरी लावतात. दोन वर्षांपूर्वी येथे दोन गटात दंगल झाली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र पोलीस यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे.
दोन वर्षापूर्वीची भीमकोरेगाव येथे झालेल्या अनुचित प्रकाराची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये. यासाठी मॉब डिस्पोजल दंगाकाबूची रंगीत तालीम घेतल्या जात आहेत. कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाच्या अनुषंगाने तालुक्यात खेड पोलीस स्टेशन अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन टोम्पे यांचे मार्गदर्शन खाली मॉब डिस्पोजल दंगाकाबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
या सरावादरम्यान अश्रुधूर, हॅन्डग्रेनेड यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या सरावात 1 पोलीस निरीक्षक, 21 पोलीस जवान, 11 होमगार्ड सहभागी झाले होते. या सरावादरम्यान 2 हॅन्डग्रॅनेड सेल व 1 टी. येर.स्मोकसेलचा वापर करण्यात आला. येथील क्रीडा संकुलात अचानक पोलिसांच्या मॉब डिस्पोजल दंगाकाबूची रंगीत तालीम सुरू झाल्याने येथे उपस्थित असलेल्या खेळाडू आणि स्थानिक नागरिक गोंधळात सापडले.
पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या रंगीत तालमीमुळे क्रीडा संकुल मोठी घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने अनेकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. येथे उपस्थित खेळाडूंच्या मदतीने हे मोकड्रिल यशस्वी केले. रंगीत तालमीनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.