अरुण गोखले
आपल्याला जे हवे त्याची मागणी करणे, या संदर्भात हट्ट आणि हेका हे दोन्ही शब्द वरवर सारखेच आहेत, असे जरी वाटत असले. तरी त्या मागे दोन भिन्न भावना असतात.
या बाबतीत जाणकार, विचारी आणि अनुभवी लोकांकडून आपल्याला हाच सल्ला दिला जातो की बाबांनो! तुम्ही तुमच्या जीवनात एखाद्या गोष्टीसाठी हट्ट हा जरूर करा, पण ती गोष्ट मला हवीच असा हेका मात्र धरू नका.
आता हा असा सल्ला का? तर ते म्हणतात, असं बघा हट्ट हा कोण करतात? तर प्रामुख्याने लहान मुले. मला एखादी वस्तू हवी, एखादे खेळणे हवे, खाऊ हवा. या त्या बालकाच्या हट्टामागे एक प्रेम असते. त्या हट्टाच्या मागणीची भाषा प्रेमळ अन् लडिवाळ अशी असते. अशी मागणी माणसांनाच काय पण प्रत्यक्ष देवालाही नाही म्हणवत नाही.
बरं एखादा हट्ट हा समजा की काही कारणांनी पुरवला गेला नाही तर त्यासाठी हट्ट करणारी व्यक्ती फार आग्रही नसते. काही काळांनी तो हट्ट विसरलाही जातो. हट्टाची भाषा दुसऱ्याचे मन जिंकणारी असते. त्यामुळेच शक्यतो असे लडिवाळ हट्ट हे टाळले जात नाहीत तर ते हरप्रयत्नाने पुरविले जातात.
मात्र, हेका गाजविणारी मागणी… तिचे शब्द हे आग्रही काहीसे हक्क बजावणारे, कठोर आणि कटू असतात. आपण धरीत असलेला हेका योग्य आहे का नाही, त्याने समोरच्या व्यक्तीवर कोणता परिणाम होतोय, ह्याचा विवेक विचार त्या हेका धरण्याने केलेला नसतो.
जेव्हा मोठी माणसे हट्टाला आपल्या आग्रही वृत्तीचे हेकेखोर स्वरूप देतात त्यावेळी त्याचं स्वरूप पार बदलते. मला ही गोष्ट हवी म्हणजे हवीच त्यासाठी मी दुसऱ्याच्या मनाचा, भावनांचा विचारही न करणे हे त्या आग्रही आणि हेकेखोर वृत्तीतून निदर्शनास येते. हेका हा स्वार्थ, लोभ, मी आणि मलाच या भावनेतून केला जातो. हेका धरताना प्रामुख्याने स्वत:च्या इच्छा, भावना, अपेक्षा ह्यांचाच विचार केलेला असतो.
तर हट्टामध्ये स्वार्थ लोभ आसक्ती हे त्या मानाने फार कमी प्रमाणात असते. हट्ट हे आनंदाने पुरविले जातात. ते पुरविणाऱ्याला आणि पुरवून घेणाऱ्याला अशा दोघांनाही आनंद, सुख, समाधान मिळत असते. हेकेखोरपणा हा गुणात नाही तर दुर्गुणात मोडतो, हे विसरून चालणार नाही.