मंडाले : भारताच्या पंकज अडवाणी व आदित्य मेहता यांनी जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. आंतरराष्ट्रीय बिलियर्डस व स्नूकर महासंघातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम फेरीत त्यांनी थायलंडचा 5-2 अशा फ्रेम्सने पराभव केला.
अडवाणीचे जागतिक स्तरावरील हे 23 वे विजेतेपद आहे. आदित्यचे हे पहिलेच जागतिक विजेतेपद आहे. या जोडीने अंतिम सामना 65-31, 9-69, 74=8, 21-64, 55-44, 72-23, 83-9 असा जिंकला.
आदित्यने सांगितले की, पहिले जागतिक विजेतेपद हे नेहमीच संस्मरणीय असते. गेली अनेक वर्षे मी हे स्वप्न साकार करण्यासाठी झगडत होतो. हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. या विजेतेपदाचा मला भावी करिअरसाठी उपयोग होणार आहे.
पंकजने सांगितले की, करिअरमध्ये आजपर्यंत वीसहून अधिक अजिंक्यपदे मिळविली असली तरी प्रत्येक विजेतेपद माझ्यासाठी नवीनच असते. ते साध्य करण्यासाठी मी खूप मेहनत केली होती. त्याचा मला फायदा मिळाला. जागतिक बिलियर्डस स्पर्धेनंतर लगेचच स्नूकरची अव्वल दर्जाची स्पर्धा खेळणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. तथापि आत्मविश्वासाने मी खेळलो आणि आदित्यचीही सुरेख साथ मिळाली. त्यामुळेच मला हे यश मिळविता आले.