हाफिज सईदच्या मदतीसाठी पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत

इस्लामाबाद  – दहशतवादाला आम्ही पाठींबा देत नाही असे म्हणनाऱ्या पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईदच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धाव घेतली आहे.

मुंबई हल्ल्याचा सुत्रधार व जागतिक दहशतवादी हाफिज सईदला कुटुंबाच्या मासिक खर्चासाठी त्याच्या बॅंक खात्याचा वापर करु दिला जावा, अशी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्तानची ही मान्य करत जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला त्याच्या बॅंक खात्याचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून पाकिस्तानची ही मागणी मान्य करण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडून निश्‍चित करण्यात आलेल्या कालवधी दरम्यान कोणतीही दहशतवादी कारवाई घडली नव्हती. 15 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, हाफिज सईद, हाजी मोहम्मद अशरफ आणि जफर इकबाल यांना त्यांच्या सामान्य खर्चासाठी बॅंक खात्यांचा वापर करण्यास परवानगी दिली जात आहे. 15 ऑगस्टपर्यंत या दहशतवाद्यांकडून घातपात घडवला जाण्याची शक्‍यता होती.

पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेस पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले होते की, हाफिज सईदच्या कुटुंबात चार सदस्य आहेत व त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या खाण्या पिण्यासह कपडे आदींची व्यवस्था त्यालाच करावी लागते, त्यामुळे त्याला बॅंक खात्याचा वापर करण्याची परवानगी दिली जावी. हाफिजचे बॅंक खाते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार पाकिस्तानला बंद करावे लागले होते. यानंतर आता त्याचे बॅंक खाते पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.