छपरा : बॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. ज्याचा शेवट अजय देवगण त्याची पत्नी ऐश्वर्याचं लग्न सलमान खान सोबत लावून देण्यासाठी तयार होतो. हाच सीन एका जोडप्याच्या आयुष्यात खराखुरा घडला आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळाल्यानंतर खुद्द पतीने प्रियकरासोबत तिचे लग्न लावून दिल्याची घटना घडली आहे.
बिहारच्या छपरामध्ये ही घटना घडली आहे. विवाहित महिलेचे एका व्यक्तीसोबत सूत जुळल्यानंतर तिच्या पतीनं तिचा विवाह त्या व्यक्तीसोबत करून दिला.छपरामध्ये घडलेल्या घटनेबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराचे लग्न एका मंदिरात लाऊन दिले. त्यानंतर ते मंदिरातून परतत असताना कोणीतरी व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रियकरासोबत लग्न केलेल्या महिलेला एक मुलगी आहे. तिच्या प्रियकराने या मुलीचा स्वीकार केला आहे.
महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर पत्नी एका व्यक्तीचा प्रेमात पडली. मी आनंदाने त्यांचा विवाह करून दिला. तर प्रियकरासोबत लग्नबंधनात अडकलेल्या महिलेने पतीवर मारहाणीचा आरोप केला. मी आनंदाने दुसरे लग्न केल्याचे महिलेने सांगितले. या महिलेनेच नाव निकी असे आहे.
“मी माझ्या मर्जीने माझ्या पतीशी काडीमोड घेतला असून दुसरं लग्न केल्याचे” निकीने व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितले आहे. निकीच्या दुसऱ्या पतीने तिच्या पहिल्या पतीवर छळ केल्याचा आरोप केला आहे. ‘आम्ही ६ महिन्यांपासून सोबत आहोत. यापुढेही सोबत राहू. आम्हाला एक मुलगी आहे. तिचा आम्ही नीट सांभाळ करू,’ असे दुसऱ्या पतीने म्हटले.