ठाणे – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 24 पैशांची, तर डिझेलच्या दरात 29 पैशांची वाढ केली. त्यामुळे ठाणे या महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात पेट्रोल दराने शंभर रूपयांची पातळी ओलांडली. तर, मुंबईत त्या इंधनाचा दर 99 रूपये 94 पैसे इतका झाला आहे.
त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे फलक सबंध ठाणे शहरात लावले आहेत. या फलकांवर अच्छे दिनाच्या शुभेच्छा देऊन मोदी सरकारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला आहे.
सार्वजनिक कंपन्यांनी चालू महिन्यात 14 वी इंधन दरवाढ केली. दरवाढीच्या सत्रामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काही शहरांत पेट्रोल दराने याआधीच शंभरी ओलांडली आहे. त्यामध्ये आता ठाण्याची (100.06 रूपये) भर पडली.
याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत. सबंध ठाणे शहरात लावण्यात आलेल्या या फलकावर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. “ मॅन ऑफ दि मॅच; पेट्रोल 100 नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा संदेशही या फलकांवर लावण्यात आला आहे. या फलकांची ठाणे शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.