अग्निशमन विभागापुढे प्रश्न : “लॉकडाऊन’च्या काळात शासनाचे आदेश
पिंपरी – शहरातील सर्व शाळा बंद असल्याचे माहीत असतानाही शाळामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शन व मॉकड्रिलचे आयोजन करण्याचे आदेश राज्याच्या अग्निशमन सेवा संचालनालयाने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिले आहेत. यामुळे बंद शाळांमध्ये “मॉकड्रिल’ कसे आणि कुणासाठी करायचे? असा प्रश्न अग्निशामन विभागास पडला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे सहसचिव रमेश कुमार जी यांच्या 28 जुलै 2020 च्या आदेशाचा संदर्भ देत, हे आदेश देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन शिकविण्यासाठी सर्व शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट ऍथारिटीच्या वतीने राज्याच्या अग्निशमन सेवा संचालनाला दिले जातात. दरवर्षी शाळांमध्ये आयोजित मॉकड्रिलचा अहवालदेखील पाठवावा लागतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अग्निशामक दलाच्या खांद्यावर आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शन व मॉकड्रिलचे आयोजन करण्याची जबाबदारी आहे. दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून सर्वच शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था बंद आहेत. दहावीचा एक पेपर न घेताच निकाल जाहीर करण्यात आला आहे. तर महाविद्यालयांच्या परीक्षा घ्याव्यात की नाही ? याबाबत अद्यापही राज्य व केंद्रात तू-तू मैं-मैं सुरु आहे.
शाळेत एकही विद्यार्थी फिरकत नसून, सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिकविले जात आहे. विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती नसताना, नेमके हे मॉकड्रिल कोणासाठी आयोजित करावे? असा प्रश्न महापालिका अधिकाऱ्यांबरोबरच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. अशाप्रकारचा आदेशच केंद्र व राज्य सरकारने काढायला नको, असा सूर अधिकारी काढत आहेत.
‘या’ नगरपरिषदा, महापालिकांना आदेश
केंद्र सरकारच्या अमृत योजनेत सहभागी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मॉकड्रिल आयोजनाचा आदेश देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, वसई-विरार, सातारा, सांगली-मिरज, कोल्हापूर सह राज्यातील एकूण 41 स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले आहेत.