धमकी देऊन मोबाईल आणि रोकड घेतली
पुणे – मैत्रीणीला सोशल मीडियावर सेल्फी अपलोड करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करण्यात आले आहे. हे कृत्य दोघा सख्ख्या भावांनी केले आहे. कोथरुड येथील एका 25 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनूसार वैभव दिलीप कातोरे, रोशन दिलीप कातोरे (दोघे रा. ओंकारपुरम सोसायटी, कोथरुड) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी तरुणी आणि वैभव कातोरे हे मुळचे नाशिकचे आहेत. शिक्षण घेत असताना त्यांची एका कोचिंग क्लासमध्ये मैत्री झाली होती. यानंतर शिक्षण झाल्यावर संबंधित तरुणी पुण्यात नोकरीसाठी दाखल झाली. यानंतरही वैभवने फोनवर गोड गोड बोलून तिच्याशी मैत्री कायम ठेवली. दरम्यान तोही भावासह पुण्यात रहावयास आला. येथे आल्यावर त्याने वारंवार फोन करुन तिला लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली. तिच्या कंपनीमध्ये येऊनही वैभव ती आपली बायको असून तिच्याशी नीट वागायचे असा दम तेथील कर्मचाऱ्यांना देत होता.
दरम्यान त्याने एकदा तिला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचे लग्न इतर मुलाबरोबर ठरल्यावर आपला सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करेल आणि नवरा मुलाला पाठवेल, अशी धमकी तिला दिला. यानंतर तिला जबरदस्तीने 7500 रुपये पाठविण्यास सांगितले. तर वैभवचा भाऊ रोशन याने तिला भेटून वैभवला फोन घेऊन दे असे सांगत जबरदस्तीने 14 हजाराचा फोन घ्यायला लावला. वैभव हा सध्या कोणतेच काम करत नाही तर रोशन हा सीओईपी महाविद्यालयात इंजिनिअरींगचे शिक्षण घेतो. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक किरण बालवडकर करत आहेत.