ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह : मुख्यमंत्री  

पाथर्डी – ऊसतोडणी कामगारांची संख्या लक्षात घेवून त्यांच्या विकासासाठी ऊसतोडणी महामंडळ तयार केले. तोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच प्रत्येक ऊसतोडणी कामगाराचे घर व्हावे, या हेतुने महामंडळाच्या माध्यमातून घरबांधणीसाठी अडीच लाख रुपये दिले जाणार आहेत. मोनिकाताई तुम्ही जागा सुचवा, तुम्हाला हवे तिथे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह प्राधान्याने बांधून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथर्डी येथे बोलताना दिले.

भाजपच्या महाजनादेश यात्रेचे पाथर्डी तालुक्‍यात स्वागत करण्यात आले. या यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार वैभव पिचड, आमदार सुरजीतसिंह ठाकुर, दिलीप गांधी, माजीमंत्री बबनराव पाचपुते, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, शेवगावचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ना. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता आपले दैवत असल्याची शिकवण दिली. त्यामुळे जनतेच्या दर्शनासाठी महाजनादेश यात्रा काढली आहे. राष्ट्रवादीच्या दोन तर कॉंग्रेसची एक यात्रा निघाली आहे. गेल्या पंधरा वर्षाच्या सत्तेत या दोन्ही पक्षाची माजुरी आणि मुजोरी जनतेने अनुभवलेली आहे. या दोन्ही पक्षाला जनतेने सत्तेतुन बाहेर फेकल्यामुळे लोकांमध्ये जावे लागते, याची त्यांना जाणीव झाली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे जिंकल्या तर ईव्हीएम चांगले अन्‌ भाजप जिंकली तर ईव्हीएम वाईट अशी दुटप्पी भूमिका विरोधकांची झाली आहे. तुम्हाला ईव्हीएमने नाही तर मतदारांनी हरवले आहे. कितीही यात्रा काढा, पुढील पंचवीस वर्षे देशात भाजपची सत्ता राहणार आहे. तुमच्या यात्रांमुळे निदान तुम्हाला विरोधी पक्षाचा सराव होईल, अशी खिल्ली फडवणीस यांनी उडवली.

गेल्या पंधरा वर्षात कॉंग्रेस आघाडी करू शकली नाही. ती सर्व कामे भाजप सरकारने करून दाखवली आहेत. शेतकरी अडचणीत आला, तेव्हा सरकार त्यांच्या मागे खंबीर उभी राहिली. सर्वात मोठी कर्जमाफी भाजप सरकारने करून दाखवली आहे. शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. गेल्या पाच वर्षात पन्नास हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यात मदत स्वरूपात जमा करण्यात आले. शेवगाव पाथर्डी मतदार संघात आ. राजळे यांनी केलेल्या विकास कामाची माहिती देणारे विकास पर्व या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक आ. राजळे यांनी केले.

दौऱ्यांची जोरदार तयारी
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाकडून रस्ते दुरुस्ती, शहर स्वच्छता, विविध ठिकाणी रंगरंगोटी, अशी जोरदार तयारी करण्यात आली. दोन दिवसांपासून शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याने शहराला छावणीचे स्वरूप आले होते.

तब्बल तीन तासांनी वीजपुरवठा
मुख्यमंत्री पाथर्डी शहरात येण्यापूर्वीच वीज महामंडळाने दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील व तालुक्‍यातील अनेक परिसराची वीजपुरवठा खंडित केली होती. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मुख्यमंत्री गेल्यानंतर तब्बल तीन तासाने शहराचा वीजपुरवठा सुरळीत झाला.

आप्पासाहेब राजळेंचे अभीष्टचिंतन
माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नव्हते. आज सकाळी साडेअकरा वाजता कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणातील हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. आ. मोनका राजळे यांच्या घरी जाऊन त्यांनी आप्पासाहेब राजळे यांना शुभेच्छा दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.