शिक्षकांनी काळ्या फिती लावून केले काम

कोपरगाव प्रश्‍नी शिक्षण समितीची आज बैठक; शिक्षण विस्तार अधिकारी शेख यांच्या पाठीशी

नगर /कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यात शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दोन महिन्यात दोन शिक्षकांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत स्थानिक शिक्षकांसह जिल्हाभरातील बारा हजार शिक्षकांनी याप्रश्‍नी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी,दि.27 सायंकाळी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाने बैठक आयोजित केली असून तिला सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीनींना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे जिल्ह्यातील गुरूजींचे लक्ष लागले आहे. मात्र, संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही असा निर्धार शिक्षक संघटनांनी केला आहे.

कोपरगाव तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांना मिळणारी अपमानस्पद व दडपशाहीची वागणूक याविरोधात स्थानिक शिक्षकांनी शनिवारी आक्रोश मेळावा घेत 30 ऑगस्टला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या आक्रोश मेळाव्यास जिल्हाभरातील शिक्षक संघटनांचे पुढारीही उपस्थित होते. यावेळी जिल्हा पारिषदेवर मोर्चा व त्यानंतरही कारवाई न झाल्यास 5 सप्टेंबरच्या शिक्षक पुरस्कारावर बहिष्कार टाकत कार्यक्रमस्थळी बोंबाबोंब आंदोलन केले जाणार आहे. प्रारंभी याविषयावर कोणतीच भूमिका न घेता मौन पाळणाऱ्या शिक्षण विभागाने आता याविषयावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेत मंगळवारी बैठक बोलवली आहे.

काळ्या फिती लावून शिक्षकांनी केले काम
कोपरगाव तालुक्‍यातील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आज त्यांचा निषेध व्यक्त करत काळया फिती लावून शाळेत काम केले.जोपर्यंत शबाना शेख यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत काळया फिती लावून कामकाज सुरू ठेवणार आहेत.येत्या 30 तारखेला शेख यांच्या विरोधात अहमदनगर जिल्हा परिषदेवर शिक्षकांचा मोर्चा काढून निलंबनाची मागणी करणार असल्याचे शिक्षक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.तालुक्‍यातील संपूर्ण 175 शाळेतील 650 शिक्षकांनी काळया फिती लावून निषेध व्यक्त केला.

शिक्षण विस्तार अधिकारी शेख यांच्या पाठीशी
कोपरगाव तालुक्‍यातील टाकळी येथील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांस मारहाण केली म्हणून शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी शाळेस भेट देवून पालकांची समजूत काढली व मुख्याध्यापकास नोटीस दिली.याचा राग मनात धरून त्यांनी आत्महत्या करीत असल्याचा संदेश दिला व माध्यमांना चुकीची माहिती दिली.त्यामुळे शेख प्रचंड मानसीक दबावात आहेत.त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे.वास्तविक त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्‍याची शैक्षणिक प्रगती वाढली आहे.त्यामुळे त्यांच्यावर एकतर्पी कारवाई होऊ नये अशी मागणी राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून केली आहे.

गरीब मुलांची गुणवत्ता वाढवली हा माझा गुन्हा आहे का? : शबाना शेख
कोपरगाव तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना आधुनिक शिक्षण प्रणाली वापरून शिक्षकांच्या सहकार्याने ज्यादा तास घेवून गुणवत्ता वाढावण्यासाठी केलेला माझा प्रयत्न होता. तो जर माझा गुन्हा असेल तर प्रशासन माझ्यावर जी कारवाई करेल त्यास मी तयार आहे. नियमबाह्य कोणतेच काम केले नाही किंवा कोणाला जाणीवपुर्वक त्रास दिला नाही, असे स्पष्टीकरण पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी दै. प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले.

गेल्या पाच वर्षापासून कोपरगाव तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा कित्येक पटीने उंचावला आहे. इथे शिकणाऱ्या गरिबांच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांच्यामधली गुणवत्ता वाढवत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने कोपरगावचे नावलौकिक केला. आज तालुक्‍यातील जिल्हा परिषदेत शिकणारे मुलं शिष्यवृत्ती व स्पर्धा परिक्षेत जिल्ह्यात चमकत आहेत.शाळांच्या इमारतीची अवकळा कमी करुन लोकवर्गणीतुन सुधारणा केली.संगणक प्रणाली सुरू केली. कामात कुचराई करणाऱ्या शिक्षकांना शासकीय नियमाप्रमाणे नोटिसा बजावल्याण काही शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी जी गोष्ट करणे गरजेचे होते तीच फक्त शासकीय नियमात राहून केली .

प्रशासकीय कामकाज करीत असताना प्रशासनाचा भाग म्हणून मी जे काही केलेले काम असेल किंवा कोणावरती काढलेल्या नोटीसा असतील त्यात माझे वैयक्तीक कोणतेच हीत नव्हते.हा प्रशासकिय शिस्तीचा भाग असतो ते काम मी केले. त्यातून माझ्यावर बिनबुडाचे आरोप होतात हे ऐकुण मनाला वेदना होत आहेत.

एका बाजूला तालूक्‍यातील अनेक गावातील प्रतिष्ठीत नागरिक कौतूक करीत असताना माझे काही शिक्षक गैरसमज पसरवून बदनामी करीत असल्याची खंत शेख यांनी व्यक्‍त केली. त्या पुढे म्हणाल्या कोणी कितीही माझ्यावर आरोप केले तरी मी बोलणार नाही पण माझे पारदर्शक काम बोलेल. प्रशासनाला माझ्या कामातून सर्वकाही दिसते. मी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही आत्ता गटातटाचे नाही मी माझ्या शिक्षण धर्माशी एकनिष्ठ आहे. मी एक सुसंस्कारीत शिक्षकाची मुलगी आहे. माझ्या कर्तव्यात मी कमी पडले नाही. इतक्‍या चांगल्या कामाचे फळ मला वाईट मिळेल अशी आशा नव्हती असेही त्या शेवटी म्हणाल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.