अवघे 4 व्हेंटिलेटर बेड शिल्लक; रुग्ण हजारोने बेडची संख्या 126 वर
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना रुग्णांचा आकडा दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या 20 हजार पार झाली आहे. तर यामध्ये गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीही सातत्याने भर पडत आहे. परिणामी वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे. शहरातील पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयेही “हाऊसफुल’ झाली आहेत.
शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून केवळ 126 बेड शिल्लक आहेत. तर त्यामध्ये अवघे 4 व्हेंटिलेटर बेड शिल्लक आहेत. बेडसाठी गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. सध्यस्थितीत अशी परिस्थिती असल्याने पुढील काही दिवसांत शहरातील करोनाची परिस्थिती भयंकर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता, ऍटो क्लस्टर या रुग्णालयांमध्ये गंभीर लक्षणे असणाऱ्या करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर बालनगरी व घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणे नसणाऱ्या मात्र करोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त काही खासगी रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे शहरातील बेडची संख्या अपुरी पडत आहे.
पालिका रुग्णालयातील बेड पुर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे. खासगी रुग्णालयातील बेडही आता अपुरे पडत असल्याने वैद्यकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. शहरामध्ये हजारोच्या संख्येने रुग्ण बाधित होत आहेत. तर, महापालिका व खासगी रुग्णालयात मिळून अवघे 126 साधे बेड शिल्लक आहेत.
शहरातील महापालिका व खासगी रुग्णालयात एकुण 1475 ऑक्सिजनसहित बेड आहेत. त्यापैकी 1282 बेडवर रुग्ण असून 193 ऑक्सिजन सध्या शिल्लक बेड आहेत. तर व्हेंटिलेटर नसलेले आयसीयू 414 आहेत. त्यापैकी 388 आयसीयू बेडवर रुग्ण असून 26 आयसीयू बेड शिल्लक आहेत. अतिगंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. शहरात पालिका व खासगी रुग्णालयांत 185 व्हेंटिलेटर बेड आहेत. त्यापैकी 181 रुग्णांवर उपचार सुरू असून अवघे 4 बेड शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर उपचार कसे करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे बाधित आढळल्यानंतर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये भरती होण्याची संख्या जास्त आहे. खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च आकारला जात असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ते परवडत नाही. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात भरती होण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
गंभीर रुग्णांची संख्या वाढली
शहरामध्ये 20 हजाराहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यामध्ये रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये साडेतीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये खोकला, ताप, धाप लागणे अशी लक्षणे दिसत आहेत. तर काही रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. शहरातील गंभीर रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पालिकेच्या डॅशबोर्डनुसार आज शहरात 141 गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर 100 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
शहरात बेडची संख्या पुरेशी नाही. साधे बेड उपलब्ध होतात. मात्र ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करणे कठीण होत आहे. पुढच्या आठवड्यात आपल्याकडे भोसरी, म्हाळुंगे व बालेवाडी येथे कोविड सेंटर सुरू करणार आहे. त्यामध्ये म्हाळुंगेमध्ये 300, भोसरी 250 व बालेवाडीमध्ये 200 बेड उपलब्ध होतील. याव्यतिरिक्त अजून काही खासगी रुग्णालयांनी आपल्याकडे परवानगी मागितली आहे. त्यांना परवानगी दिल्यावर बेडची संख्या वाढेल.
– डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी