“अनिल देशमुख तुम्ही माझा जीव घेतला तरी मी लढत राहणार”; जयश्री पाटील गृहमंत्र्यांवर भडकल्या

“शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी अनिल देशमुख कायदा आणि राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीत,”

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला असून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करत १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

जयश्री पाटील यांनी यावेळी पोलीस डायरीत आपलं नाव येऊ न दिल्याचं सांगत अनिल देशमुखांवर निशाणा साधला. “शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी अनिल देशमुख कायदा आणि राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीत,” अशा शब्दांत यावेळी त्यांनी टीका केली. “अनिल देशमुख तुम्ही उद्योजकांना, सर्वसामान्यांना अशा पद्धतीने धमकावू शकत नाही. माझा जीव घेतला तरी मी लढत राहणार आहे,” असंही यावेळी त्या म्हणाल्या.

“उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याचा मला आनंद आहे. १५ दिवसांत सीबीआयने प्राथमिक तपास करायचा आहे. गरज लागल्यास मलादेखील बोलवायचं आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. “अनिल देशमुख जर तुम्ही गृहमंत्री असाल आणि तुमच्या अंतर्गत महाराष्ट्र पोलीस असतील तर तुम्ही योग्य तपास होऊ देणार नाही असे कोर्टाने म्हटलं असून सीबीआयला प्राथमिक तपास करण्यास सांगितलं आहे,” असेही यावेळी त्यांनी सांगितले.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने परमबीर यांनी केलेल्या याचिकेसह अन्य याचिकांवरील निर्णय बुधवारी राखून ठेवला होता. निर्णय देताना न्यायालयाने सांगितलं की, ‘जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात आहेत त्यामुळे असामान्य स्थिती म्हणून सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले जात आहेत. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय सीबीआयने घ्यावा’. आरोप गृहमंत्र्यांविरोधात असल्याने पारदर्शी चौकशी गरजेची असल्याचं न्यायालयाने यावेळी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.