कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे इथल्या होम क्वारंटाइन असलेल्या एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. राहुल पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
राहुल हा बंगळूर येथील एका नामांकित कंपनीत नोकरीला होता. तो एम.टेक आहे. लॉकडाऊन असल्याने त्याचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. तो 18 जुलै रोजी गावी आला. येताना त्याने शेंद्री माळवरील कोविड सेंटरला जाऊन तपासणी करून घेतली. कोणतीच लक्षणे नसल्याने त्याचा स्वॅब घेतला नाही.
त्यानंतर त्याला गिजवणे येथील घरात क्वारंटाइन केले होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याने क्वारंटाइन असलेल्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली.आज सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.