सोने दरवाढीचा परिणाम
मुंबई – जानेवारी 2019 पासून आतापर्यंत सोन्याच्या मूल्यात तब्बल 60 टक्के वाढ झाली आहे. करोना व्हायरसचा संसर्ग झाल्यापासून तर सोन्याचे दर वेगाने वाढत आहेत. मात्र, दरवाढीमुळे दागिन्यांची मागणी कमी झाल्याने दागिणे उत्पादकांसमोर विचित्र पेच निर्माण झाला आहे.
सर्वसाधारण मागणीच्या तुलनेत सध्या दागिन्यांची मागणी केवळ 20 ते 25 टक्के आहे. कारण सोन्याचे दर 51 हजारांवर गेले आहेत. त्याचबरोबर उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, आणि रोजगार अनिश्चित झाल्यामुळे लोक दागिने खरेदीला अनावश्यक समजत आहेत. भारतामध्ये सणावेळी आणि लग्नाच्या वेळेस दागिन्याची खरेदी हमखास केली जाते. मात्र, यावर्षी लग्न जमविणे आणि लग्न करणे यालाही मर्यादा आल्या आहेत.
त्यामुळे विवाह समारंभ कमी झाले आहेत. त्याचा परिणाम दागिने उद्योगावर झाला आहे. त्याचबरोबर शेअर, चलन बाजारातील अनिश्चिततेचा दागिने बाजारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोन्याचे भाव कोणत्या पातळीवर स्थिर होतील याबद्दल ग्राहकाला उत्सुकता आहे. डिसेंबरपर्यंत तरी सोन्याचे दर स्थिर होणार नाहीत असे जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी. आर. यांनी सांगितले. भारतात मुळात फार कमी प्रमाणात सोन्याचे उत्पादन होते. त्यामुळे जागतिक परिस्थितीचा भारतातील सोन्याच्या दरावर थेट परिणाम होतो.
गुंतवणूकदार सोन्याकडे वळले असल्याने सोने महागले आहे. त्यामुळे दागिने उद्योगावर परिणाम होत आहे. त्यात जगातील बऱ्याच रिझर्व्ह बॅंकांबरोबरच भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 2018 पासून सोने खरेदीचे धोरण चालू ठेवले आहे. आता भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे 650 टन इतके सोने आहे. सध्या बाजारात भांडवल सुलभता असली तरी बरेच नागरिक सोन्याऐवजी शेअरबाजाराकडे गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येते. जगभरातील रिझर्व्ह बॅंका व्याजदर पुढचे काही वर्षे कमी पातळीवर ठेवणार आहेत. त्यामुळे अधिक परताव्यासाठी गुंतवणूकदार सोने खरेदी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोन्याचे दर वाढणार?
सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना पी. एन. गाडगीळ या पेढीचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, करोनामुळे सध्या छोट्या दागिन्यांची खरेदी होत आहे. गुंतवणुकीसाठीचे सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. एकूण जागतिक परिस्थिती पाहता पुढील बारा महिन्यांमध्ये सोन्याचे दर भारतात 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आणि जागतिक पातळीवर 2500 डॉलर प्रति औंस झाले तर आश्चर्य वाटू नये.